छत्रपती संभाजीनगर : वडिलांनी मुलाला आत्महत्येपासून वाचवण्याचा प्रयत्न करताना तोल जाऊन दोघेही दरीत कोसळले आणि डोळ्यांदेखत पती व मुलाचा झालेला मृत्यू सहन न झाल्याने आईनेही त्याच दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
ही धक्कादायक घटना तीसगाव परिसरातील खावड्या टेकडीवर घडली. जालना फाटा परिसरात राहणारा कुणाल मुरलीधर चांदगुडे (वय १९ वर्षे) हा तरुण शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजता आत्महत्येच्या उद्देशाने टेकडीवर चढला होता. घटनेची माहिती मिळताच वडील मुरलीधर चांदगुडे (वय ४८ वर्षे) आणि आई संगीता चांदगुडे घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक ग्रामस्थांनी सलग तीन तास कुणालची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्याला खाली उतरण्याची विनंती केली आणि मोबाईल घेऊन देण्याचे आश्वासनही दिले; मात्र तो अत्यंत तणावात होता.
अखेरच्या क्षणी वडील मुरलीधर स्वतः कुणालजवळ पोहोचले आणि त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करू लागले. याच दरम्यान कुणालने दरीत उडी घेतली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा तोल गेला आणि दोघेही खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
डोळ्यांसमोर पती आणि मुलाला दरीत कोसळताना पाहून आई संगीता चांदगुडे यांना मोठा धक्का बसला. तीव्र आघातातून त्यांनीही तत्काळ टेकडीवरून दरीत उडी घेत जीवन संपवले.
अग्निशामक दलाने मुलाला वाचवण्यासाठी दरीच्या पायथ्याशी मोठी सुरक्षा जाळी लावली होती; मात्र तरुणाने वरून जागा बदलल्याने जाळीचा उपयोग होऊ शकला नाही.
बॉक्स
मोबाईलच्या हट्टावरून वाद झाल्याचा दावा
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, माजी तीसगाव सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, आयफोन मोबाईल विकत घेण्याच्या मागणीवरून कुटुंबीयांमध्ये वाद झाला होता. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


