पणजी : सत्तरी तालुक्यात विविध भागातील जवळपास ९८ टक्के लोकांकडे अद्याप जमिनीची मालकी नाही. येथे अल्वारा जमिनी तसेच वन क्षेत्रातील जमिनीचे प्रमाण अधिक आहे. काही वर्षांपूर्वी सरकारने येथील लोकांना वर्ग २ असे जमिनीचे अधिकार दिले आहेत. मात्र, अद्याप पूर्ण अधिकार मिळालेले नाहीत. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जमिनीचे मालकी हक्क न दिल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सत्तरी उसगाव स्वाभिमानी मंचाचे रणजीत राणे यांनी दिला.
पणजीत गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रणजीत राणे यांनी सांगितले की, मागील काही वर्षात वाळपई, उसगाव हा भाग विकसित असल्याचे दाखवले जाते. मात्र येथील प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच आहे. येथे आजही अनेक मूलभूत समस्या कायम आहेत. म्हादई नदी जवळ असून देखील येथील गावांना पाणी मिळत नाही. अनेक घरात आजही पाणी साठवून ठेवले जाते. काही ठिकाणी तर महिला पाण्याच्या टँकरच्या मागे धावताना दिसतात. हे चित्र जाणीवपूर्वक लपवले जात आहे. पर्ये मतदारसंघात देखील अनेक समस्या आहेत. या भागातील लोकप्रतिनिधी लोकांची कामे करण्यात असमर्थतता दाखवत आहेत.
ते म्हणाले, येथील वन्य जीव अभयारण्यामुळे देखील अनेक स्थानिकांना त्यांचे अधिकार मिळत नाहीत. आम्ही निसर्ग अथवा वाघाच्या विरोधात नाही. मात्र पर्यावरणाचा समतोल राखून शाश्वत विकास झाला पाहिजे असे आमचे मत आहे. अभयारण्य जाहीर करताना येथील स्थानिकांना विश्वासात घेतले नव्हते. गाव, घरे, काजू बागा यांचे सीमांकन करण्यात आले नाही. याबाबत माहिती अधिकार कायद्या अंतर्गत वन खात्याकडे आम्ही सीमांकन आराखडा मागितला आहे. मात्र अद्याप तो आम्हाला मिळालेला नाही.


