पणजी : कदंब पठारावर भाजपच्या नवीन प्रदेश कार्यालय इमारतीवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष पेटला आहे. काँग्रेस पक्षाने सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपच्या या नवीन वास्तूला 'चंदा चोरी भवन' असे संबोधल्याने राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते सिद्धेश यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला असून, काँग्रेसचे वाढते राजकीय नैराश्य या आक्षेपार्ह विधानातून स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप केला आहे.
भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालय इमारतीबाबत काँग्रेस पक्षाने सोशल मीडियावर मोहीम चालवत या वास्तूवर 'चंदा चोरी भवन' अशी बोचरी टीका केली होती. या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. सिद्धेश यांनी स्पष्ट केले की, हे नवीन भाजप भवन म्हणजे गोव्यातील सुमारे ४ लाख निष्ठावंत भाजप कार्यकर्ते आणि सदस्यांच्या अथक मेहनतीचे तसेच विश्वासाचे प्रतीक आहे. काँग्रेसने अशा प्रकारे चिखलफेक करून पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या त्यागाचा आणि परिश्रमांचा घोर अपमान केला आहे.
काँग्रेसच्या नैतिकतेवर थेट सवाल उपस्थित करताना सिद्धेश यांनी काँग्रेसच्या भूतकाळातील विविध गैरव्यवहारांची आठवण करून दिली. नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या माध्यमातून एकरच्या एकर जमिनी आणि मालमत्ता हडप करण्याचे प्रकार काँग्रेसच्या काळात झाले, असा आरोप त्यांनी केला. तसेच विविध मार्गांनी पैसे लाटणाऱ्या काँग्रेस पक्षाला भाजपच्या नवीन भवनावर किंवा निधी संकलनावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे त्यांनी ठामपणे मांडले. या संपूर्ण प्रकरणात भारतीय जनता पक्षातर्फे काँग्रेसच्या या आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.


