लोकनायक बाबू नायक यांच्या प्रेरणेतून समाजकार्य पुढे न्यावे!

डॉ. अनिल काकोडकर : मडगावात बाबू नायक जन्मशताब्दी सोहळा उत्साहात

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
19th August, 11:51 pm
लोकनायक बाबू नायक यांच्या प्रेरणेतून समाजकार्य पुढे न्यावे!

मडगाव : महनीय व्यक्तीने केलेल्या भरीव कामाची पोचपावती लोकांनी देणे याला फार महत्त्व आहे. त्यांच्या कामांचे मूल्यमापन होतानाच नव्या पिढीला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. ही सामाजिक उत्क्रांती आचारातून, विचारातून समाजात सतत घडते व त्यातून समाजात बदल घडत असतो. लोकनायक बाबू नायक यांच्या कार्यातून प्रेरणा घेत त्यांचे कार्य पुढे नेण्याचे प्रयत्न होत राहावा, असे प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

लोकनायक अनंत (बाबू) नरसिंह नायक यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा शुभारंभ बुधवारी मडगाव क्रिकेट क्लबच्या सभागृहात पार पडला. यावेळी समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, माजी मंत्री एदुयार्द फालेरो, माजी खासदार लुइझिन फालेरो, माजी न्यायाधीश फेर्दिन रिबेलो, आमदार विजय सरदेसाई, माजी मंत्री चर्चिल आलेमाव, निर्मला सावंत, माजी आमदार प्रकाश वेळीप उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी ‘लोकनायक’ या माहितीपटाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. काकोडकर यांनी सांगितले की, गोव्याला यायची संधी मिळाली की ती मी सोडत नाही. धेंपे यांनी आपणास या कार्यक्रमाबाबत सांगितले, त्यावेळी आपण तत्काळ हो म्हटले. लोकनायक बाबू नायक यांच्याबाबत फारशी माहिती नव्हती पण जसजशी माहिती मिळवली त्यावरुन लोकनायकांनी गोव्यासाठी राजकीय, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात काम केलेले आहे. त्यांचे कार्य गोव्याच्या जनतेला नक्कीच भावलेले असल्याने अनेक लोक या समारंभाला आलेले आहेत.

राज्यकर्ते येतात जातात, पण ज्या संस्था उभ्या करण्यात आलेल्या आहेत, त्या संस्थांच्या बळावर समाज पुढे जात असतो. गोव्यात विविध धर्म, विविध संस्कृती आहेत, ही या समाजाची सबलता आहे. त्यासाठी बाबू नायक यांच्यासारख्या सुपुत्रांच्या कार्याचा हातभार असतो, असेही त्यांनी सांगितले.

श्रीनिवास धेंपे यांनी सांगितले की, मडगाव शहरात जन्मलेले महान व्यक्तिमत्त्व बाबू नायक यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होते, हा हृदयस्पर्शी क्षण आहे. माझे आजोबा वसंतराव धेंपे व बाबू नायक यांचे नाते घट्ट होते. वडील स्व. वासुदेव धेंपे यांनीही हे नाते पुढे नेले. त्यांनी निर्माण केलेला विश्वास, आदर अजूनही या पिढीपर्यंत कायम आहे. तत्व, निष्ठा, विचारधारा व लोकांची सेवा यावर बाबू नायक यांचे राजकारण व समाजकारणाचे धोरण राहिले. त्यांची मते ठाम व विचार स्पष्ट होते. त्यांना लोकांनीच ‘लोकनायक’ ही पदवी दिली, ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. त्यांनी लोकांच्या मनात स्थान मिळवले होते व अजूनही गोमंतकीयांच्या मनात त्यांच्या आठवणी कायम आहेत. आताच्या पिढीला बाबू नायक कोण हे समजणे आवश्यक आहे, असे धेंपे यांनी सांगितले.

पुढीलवर्षी होईल गौरवग्रंथाचे लोकार्पण

यापुढील वर्षभर विविध कार्यक्रमांतून बाबू नायक यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यात येईल. जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुढीलवर्षी ‘अनंत इन्फायनाइट’ या गौरवग्रंथाचे लोकार्पण केले जाईल. बाबू नायक यांचे विचार, तत्वे व आदर्श पुढील पिढीला प्रेरणादायी ठरतील, असेही धेंपे यांनी सांगितले. 

हेही वाचा
सर्व पहा