मडगाव : दक्षिण गोवा जिल्ह्यात सलग पाचव्या वर्षी स्थानिक पातळीवर मलेरियाची एकही लागण झाली नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. २०२२ पासून जून २०२६ पर्यंत जिल्ह्यात एकही स्थानिक मलेरिया रुग्ण आढळलेला नाही. मात्र, या काळात आढळलेले सर्व रुग्ण राज्याबाहेर किंवा देशाबाहेरून संसर्ग घेऊन आले असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.
दक्षिण गोव्यात २०२३ मध्ये आयातीत रुग्णांची संख्या सर्वाधिक ३४५ होती. त्यानंतर त्यात घट झाली असून २०२२ मध्ये १४७, २०२३ मध्ये ३४५, २०२४ मध्ये ३२६ आणि २०२५ मध्ये २३४ आयातीत रुग्णांची नोंद झाली. जून २०२६ पर्यंत ६९ रुग्ण आढळले आहेत. मलेरिया नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून रक्त तपासणी करण्यात येत आहे. २०२२ मध्ये ९०,२७४ रक्त नमुने तपासण्यात आले. २०२३ मध्ये ही संख्या १,१८,४४४, २०२४ मध्ये १,३८,१२९ आणि २०२५ मध्ये १,३९,१३५ झाली. जून २०२६ पर्यंत ६२,१४३ नमुने तपासण्यात आले.
आरोग्य केंद्रनिहाय आकडेवारीनुसार, कुठ्ठाळी येथे आयातीत मलेरिया रुग्णांची संख्या २०२२ मध्ये २४, २०२३ मध्ये ३८, २०२४ मध्ये १२८, २०२५ मध्ये ८० आणि जून २०२६ पर्यंत १० रुग्णांची नोंद झाली. कुडचडे येथे अनुक्रमे ३, १८, १, १ आणि १, तर सांगे येथे १, ९, १, ३ आणि शून्य रुग्ण आढळले. लोटली येथे २०२२ ते जून २०२६ या कालावधीत अनुक्रमे १, ११, ४, १७ आणि ५, तर चिंचणी येथे १, १०, ८, १ आणि २ रुग्णांची नोंद झाली. केपे येथे २, ३, शून्य, ३ आणि २ रुग्ण आढळले. धारबांदोडा येथे २०२२ मध्ये एकही रुग्ण नव्हता; २०२३ मध्ये ६, २०२४ मध्ये शून्य, २०२५ मध्ये २ आणि जून २०२६ पर्यंत पुन्हा शून्य रुग्णांची नोंद झाली. नावेली येथे २०२२ मध्ये ४, २०२३ मध्ये ११, २०२४ मध्ये ७, २०२५ मध्ये ३ आणि जून २०२६ पर्यंत १ आयातित रुग्ण आढळला. बेतकी येथे अनुक्रमे ३, ३, १०, १ आणि शून्य रुग्णांची नोंद झाली.
आरोग्य यंत्रणेचा उपाययोजनांवर भर
सततची देखरेख, लवकर निदान, डासांच्या उत्पत्तीस्थळांवर नियंत्रण आणि समुदाय पातळीवरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे स्थानिक मलेरिया संक्रमण रोखण्यात यश आल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आयातीत रुग्णांमुळे स्थानिक पातळीवर पुन्हा संक्रमण होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेकडून सर्वेक्षण आणि डास नियंत्रणाच्या उपाययोजना सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
मलेरियाचे संक्रमण थांबविणे हे उद्दिष्ट हवे : मार्टिन्स
शून्य रुग्ण दाखविणे हा उपाय नाही. एक रुग्ण आढळला तरी त्याचा आढावा घेऊन आवश्यक सुधारात्मक उपाययोजना करता येतात. मलेरियाचे संक्रमण पूर्णपणे थांबविणे हे आरोग्य यंत्रणेचे उद्दिष्ट असावे. मलेरियाची आकडेवारी केवळ जिल्हास्तरावर न ठेवता ती ब्लॉक अथवा आरोग्य केंद्रनिहाय जाहीर करावी, सूक्ष्म पातळीवरील आकडेवारीमुळे मलेरियासाठी संवेदनशील भाग ओळखता येतील आणि त्या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक प्रभावी ठरेल, असे मत गोवा कॅनचे रोलँड मार्टिन्स यांनी व्यक्त केले.


