संजीवनी साखर कारखाना लवकरच होणार सुरू : मुख्यमंत्री

साखर उत्पादकांनी अन्नदाता बनण्याबरोबर ऊर्जा दाता बनावे

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
51 mins ago
संजीवनी साखर कारखाना लवकरच होणार सुरू : मुख्यमंत्री

पणजी : गेली पाच वर्षे बंद असलेला संजीवनी साखर कारखाना लवकरच सुरू होणार आहे. पुढच्या वर्षी साखर उत्पादकांना संजीवनी साखर कारखान्याची भेट घडवून आणणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

 ताळगाव येथे साखर उत्पादक संघटनेच्या वार्षिक परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.  ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर बुधवारी साखर कारखानदार संघटनेच्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन झाले. तीन दिवस ही परिषद चालेल. या परिषदेत देशातील साखर उत्पादक संघाच्या प्रतिनिधींचा सहभाग आहे. 

‘सन, सँड अॅन्ड सी’चा अनुभव घेण्यासाठी सर्व जण गोव्याला भेट देतात. यात आता शुगरमधील आणखी एका एसची भर पडली आहे. संजीवनी साखर कारखाना सुरू करण्याचे सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आता पेट्रोलमध्ये ई २०चे मिश्रण केले जात आहे.

ई २० म्हणजे इथेनॉलच्या निर्मितीकडे साखर उत्पादकांनी भर देण्याची गरज आहे.  इथेनॉलची निर्मिती करून साखर उत्पादकांनी अन्नदात्याबरोबर ऊर्जादाता बनायला हवे. अधिकाधिक ऊसाचे उत्पादन करण्याबरोबर जल संवर्धन, साखर निर्मितीचे तंत्रज्ञान या विषयावर चर्चा होणार आहे. विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यात अशा प्रकारच्या परिषदा फलदायी ठरणार आहेत.

विकसित भारत २०४७चे स्वप्न साध्य करण्याबरोबर २०३७ पर्यंत विकसित गोवा करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व घटकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

हेही वाचा
सर्व पहा