खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीकामामुळे खामिणी-बोणये दरम्यानची वाहतूक ठप्प

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
6 hours ago
खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीकामामुळे खामिणी-बोणये दरम्यानची वाहतूक ठप्प

फोंडा : सावईवेरे भागातील खामिणी ते बोणये या गावामधील रस्ता ३-४ दिवसांपूर्वी खचला आहे. बांधकाम खात्याने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याने बोणये गावातील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्ता तयार करताना दोन्ही बाजूनी संरक्षक भिंती उभारण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक संरक्षक भिंत कोसळण्याच्या मार्गावर असल्यामुळे रस्ता खचल्याचे दिसून येत आहे.

खामिणी मंदिर जवळ रस्ता तयार करण्यासाठी दोन्ही बाजूनी उंच संरक्षक भिंती उभारण्यात आल्या होत्या. पावसाळ्यात डोंगराळ भागातील पाणी संरक्षक भिंतीजवळ साठून राहत होते. त्यामुळे एका बाजूने संरक्षक भिंतीला तडे गेल्याने ती कोसळण्याच्या मार्गांवर असून यामुळे रस्ता खचला आहे. बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. सध्या बोणये गावातील लोकांना खामिनी गावातून चालत घर गाठावे लागत आहे.

बांधकाम खात्याने सध्या रस्त्यावरील सर्व माती काढण्यात सुरुवात केली आहे. परंतु, संरक्षक भिंत कोसळण्याच्या मार्गावर असल्यामुळे रस्ता तयार करणे कठीण बनले आहे. या कामामुळे पुढील काही दिवस बोणये गावातील वाहतूक ठप्प राहण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा
सर्व पहा