काँग्रेस सोडलेल्या ‘त्या’ आजी, माजी आमदारांना पुन्हा उमेदवारी नको

एनजीओंनी केली राष्टीय काँग्रेस अध्यक्षांकडे मागणी; युतीची बोलणी स्थानिक नेत्यांची; मान्यता हायकमांडची :खर्गे

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
54 mins ago
काँग्रेस सोडलेल्या ‘त्या’ आजी, माजी आमदारांना पुन्हा उमेदवारी नको

पणजी : काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या त्या १९ आजी, माजी आमदारांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी एनजीओंच्या प्रतिनिधींनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली. पक्षाने जागा वाटप अगोदर म्हणजे १५ सप्टेंबरपर्यंत जाहीर करावे, अशीही मागणी एनजीओंनी केली. 

राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण गोव्यात मंगळवारी काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीची (पीएसी)  बैठक झाली. या बैठकीला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, विधीमंडळ नेते युरी आलेमाव, इतर आमदार, खासदार विरियातो फर्नांडिस, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन व इतर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीपूर्वी विविध एनजीओंच्या प्रतिनिधींनी खर्गे यांची भेट घेतली. चर्चची संस्था सीएसजेपी तसेच कॅथोलीक असोसिएशन ऑफ गोवाच्या प्रतिनिधींनीही त्यांची भेट घेतली. 

जमीन रूपांतरण तसेच मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांविरोधात राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. कलम ३९ अ व जमिनीची रूपांतरणे येत्या निवडणुकीत गाजणार आहेत. या पार्श्वभूमीवर एनजीओंनी राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षांची घेतलेली भेट महत्वपूर्ण ठरते. 

स्वप्नेश शेर्लेकर, मारियानो रिबेलो व इतरांनी खर्गे यांची भेट घेऊन त्याना मागण्यांचे निवेदन सादर केले. पक्ष वा राजकारणापेक्षा गोव्याचे हीत महत्चाचे आहे. गोवा वाचविण्यासाठी काँग्रेसशी गद्दारी केलेल्या त्या १९ आजी, माजी आमदारांना पुन्हा काँग्रेसने उमेदवारी देऊ नये. पक्षांतर करणाऱ्यांना धडा शिकविला पाहिजे, असे स्वप्नेश शेर्लेकर यांनी भेटीनंतर सांगितले. 

 १५ सप्टेंबरपर्यंत जागा वाटप जाहीर करावे

तसेच युतीबाबत निर्णय घेऊन काँग्रेसने १५ सप्टेंबरपर्यंत जागा वाटप जाहीर करावे, अशी मागणीही एनजीओंनी  केली.

अंतिम मान्यता हायकमांड देणार 

युतीबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी काँग्रेसने समिती स्थापन केली आहे. स्थानिक नेते घटक पक्षांबरोबर चर्चा करून निर्णय घेणार. अंतिम मान्यता मात्र हायकमांड देईल, असे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले.

पीएसी बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. काँग्रेस नेत्यांची बैठक यशस्वी झाली. सर्व नेते एकत्र आले. एकत्र आल्यानंतरच लढणे शक्य होणार आहे. तसेच एकत्रित लढल्यास काँग्रेसचा विजय निश्चित आहे. अधिकारांचा वापर करून विरोधक तसेच सामान्य जनतेला घाबरविण्याचे प्रयत्न सरकारकडून होत आहेत, असा आरोप त्यांनी केला. 

अम‌ित पाटकर यांना बैठकीचे निमंत्रण होते : निबांळकर 

अमित पाटकर याना बैठकीचे निमंत्रण दिले होते. ते आले नाहीत. कोणावर विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा, असे अंजली निंबाळकर म्हणाल्या.

हेही वाचा
सर्व पहा