पणजी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीच्या आमंत्रणावरून गोवा काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यात या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक उडाली आहे. या बैठकीसाठी आपल्याला कोणतेही अधिकृत आमंत्रण देण्यात आले नव्हते, असा दावा अमित पाटकर यांनी केला आहे, तर दुसरीकडे गिरीश चोडणकर यांनी सर्व पुरावे सादर करत पाटकर यांचा दावा फेटाळून लावला आहे.
पणजी येथे आयोजित राजकीय व्यवहार समितीच्या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहण्याबाबत विचारले असता, अमित पाटकर यांनी आपल्याला या बैठकीची पूर्वकल्पना नव्हती असे सांगितले. राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीचे आमंत्रण वेळेवर देणे पक्षाच्या शिष्टाचाराचा भाग आहे, मात्र प्रदेशाध्यक्षांनी फोन किंवा संदेशाद्वारे कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप त्यांनी केला. वाढत्या वयामुळे चोडणकर आमंत्रण पाठवायचे विसरले असावेत. ऐनवेळी पाच मिनिटांत पोहोचण्यासाठी आपल्याकडे प्रायव्हेट जेट नाही, अशी टीका पाटकर यांनी केली.
अमित पाटकर यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सर्व दावे फेटाळले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी पाटकर यांना फोन करून बैठकीची माहिती दिली होती, तसेच व्हॉट्सॲपद्वारे आमंत्रणपत्रिकाही पाठवण्यात आली होती, स्पष्ट करत याचे पुरावे उपलब्ध असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही वरिष्ठ नेत्यांमधील हा वाद चव्हाट्यावर आल्याने पक्षातील अंतर्गत समन्वय आणि शिष्टाचाराबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.


