गोवा ते गणपतीपुळे आंतरराज्य बससेवा सुरू

गोव्यासहीत‌ कोकणातील प्रवाशांसाठी ठरणार लाभदायक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
गोवा ते गणपतीपुळे आंतरराज्य बससेवा सुरू

पणजी : गोवा आणि महाराष्ट्रातील धार्मिक, पर्यटन तसेच व्यावसायिक प्रवास अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने पणजी ते गणपतीपुळे आंतरराज्य बससेवा सुरू झाली आहे.  

 शुक्रवारी पणजी येथील कदंबा परिवहन महामंडळाच्या (KTCL) बसस्थानकावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या नव्या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले होते.

यावेळी परिवहन मंत्री माविन गुदिन्हो, कदंबा परिवहान महामंडळाचे (KTCL)  अध्यक्ष उल्हास तुयेकर, उपाध्यक्ष क्र‌‌ितेश गावकर, परिवहन सचिव एम. शंभू (IFS), परिवहन संचालक अरविंद खुटकर, केटीसीएल संचालक मंडळाचे सदस्य कपिल सरदेसाई, व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर, सरव्यवस्थापक महेंद्र पेडणेकर, डीटीओ अँड्र्यू परेरा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

ही बससेवा पणजी–पर्वरी–म्हापसा–करासवाडा चार रस्ता–कोलवाळ–धारगळ–पेडणे–तोरसे बांदा–सावंतवाडी–कुडाळ–ओरोस–कासाळ–कणकवली–नांदगाव–तळेरे–खारेपाटण–राजापूर–ओणी–वाटूळ–लांजा–पाली–रत्नागिरी रेल्वे स्थानक–रत्नागिरी मार्गे धावणार आहे. परतीच्या प्रवासात बस गणपतीपुळेहून पूर्णगडमार्गे गोव्याच्या दिशेने येणार आहे.

गोव्याहून जाणाऱ्या बसच्या वेळा

पणजीहून बस दुपारी १.१५ वाजता सुटणार असून म्हापसा येथे १.४०, पेडणे येथे २.१५, बांदा २.४५, सावंतवाडी ३.३०, कुडाळ ४.००, ओरोस ४.२०, कासाळ ४.३०, कणकवली ५.००, नांदगाव ५.२०, तळेरे ५.३०, खारेपाटण ५.४५, राजापूर ७.००, ओणी ७.२०, वाटूळ ७.३०, लांजा ८.००, पाली ८.०५, रत्नागिरी रेल्वे स्थानक ८.१५ आणि रत्नागिरी येथे रात्री ८.३० वाजता पोहोचणार आहे.

गणपतीपुळेहून परतीचा प्रवास

गणपतीपुळेहून सकाळी ७.१० वाजता बस सुटणार आहे. धामणसे फाटा, जाकादेवी, करबडे फाटा, हातखंबा, रत्नागिरी, पावस, कळशी, आडिवरे, धारतळे, सालगाव, राजापूर, खारेपाटण, तळेरे आणि कणकवली या मार्गावरून ही बस पुढे गोव्याच्या दिशेने रवाना होईल.

नव्या आंतरराज्य बससेवेमुळे गोवा आणि कोकणातील नागरिकांना गणपतीपुळे, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये थेट आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेषतः गणपतीपुळे मंदिराला भेट देणारे भाविक, पर्यटक, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.

गोवा–कोकण दरम्यानची सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केटीसीएलच्या या नव्या उपक्रमाचे प्रवाशांकडून स्वागत होत आहे.