काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांना भाजयुमोने दाखवले काळे झेंडे

दाबोळीत तणाव : काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले


4 hours ago
काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांना भाजयुमोने दाखवले काळे झेंडे

दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलीस.
गोवन वार्ता प्रतिनिधी
वास्को : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी दाबोळी विमानतळावर आलेले भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते यांच्यासमोर काँग्रेस कार्यकर्ते आल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले. एकमेकांविरोधात घोषणा देणे, धक्काबुक्की करणे वगैरे प्रकार घडले. तथापि तेथे मोठ्या प्रमाणात तैनात असलेल्या पोलिसांनी परिस्थितीवर योग्य नियंत्रण ठेवल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. मात्र या घटनेमुळे वाहतुकीवर परिणाम झाला.
खर्गे हे वेर्णा येथे काँग्रसने आयोजित केलेल्या बूथस्तरिय एजंट व कार्यकर्त्याच्या मेळाव्याला मंगळवारी दुपारी येणार असल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते दाबोळी विमानतळावर जमा झाले होते. खर्गे यांनी १५ ऑगस्टला काँग्रेस भवनात आयोजित झेडावंदन कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’चा अवमान केल्याचा दावा करून त्यांचा निषेध करण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते दाबोळी विमानतळाबाहेर जमले होते. काळे झेडे दाखवून खर्गे यांचा निषेध करण्याच्या तयारीने ते आले होते. याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. परिस्थिती लक्षात घेऊन तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. खर्गे विमानतळावर उतल्यावर त्यांचे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले आणि ते निघाले. विमानतळाबाहेर उभे असलेल्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गाडीसमोर येण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवताना त्यांना बाजूला केले. या गोंधळात काहीजणांनी सोबत आणलेले काळे झेंडे खर्गे यांच्या वाहनावर भिरकावण्याचा प्रयत्न केला. तथापि ते झेंडे रस्त्यावर पडले.
भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत घोषणायुद्ध
भाजप युवा मोर्चा कार्यकर्ते ‘काँग्रेस पक्ष हाय हाय’, ‘वंदे मातरम्’ आदी घोषणा देत उभे राहिले. त्याचवेळी दाबोळी विमानतळावरून येणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास आरंभ केला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झाला; परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात घोषणा सुरू झाल्याने तणाव निर्माण झाला. भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यासमोर जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडविले. या घटनेत पोलिसांना बरीच धावपळ करावी लागली.