पणजी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हजेरीत होणाऱ्या मेळाव्यापूर्वी काँग्रेसच्या १०८ बूथ पातळी वरील एजंटनी (बीएलए) पक्षाचा राजीनामा दिला. सर्वांनी मुख्य निवडणूक अधिकारी तसेच प्रदेश काँग्रेस समितीकडे राजीनाम्याचे पत्र पाठविले आहे. १०८ बूथ लेवल एजंटच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील असंतोष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
यावर काँग्रेसकडून कोणीही अधिकृतपणे प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही. राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे हे प्रथमच गोव्यात येत आहेत. वेर्णा येथे बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर १०८ बीएलएंचा राजीनामा हा त्यांच्यासाठी एक प्रकारचा अपशकुनच आहे.
तीन महिन्यांपूर्वी अमित पाटकर यांची उचलबांगडी करून पक्ष नेतृत्वाने गिरीश चोडणकर यांची प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नेमणूक केली होती. यामुळे माजी अध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते दुखावले होते. मनिषा उजगावकरांसह अनेक कार्यकर्त्यांनी जाहीरपणे टीका केली होती. दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनीही प्रदेश अध्यक्ष बदलताना विश्वासात घेतले नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते.
माजी अध्यक्ष अमित पाटकर हे सध्या पक्षात असले तरी पक्षाच्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती दिसत नाही. अमित पाटकर यांनी विविध समस्यांवर पक्षाला बाजूला ठेवून स्वतंत्रपणे आंदोलन करण्याचे धोरण अनुसरले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भेटीची कल्पना पक्षाने दिली नसल्याबद्धलही त्यानी नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्षांच्या आगमनापूर्वीच १०८ बीएलएनी दिलेला राजीनामा ही पक्षासाठी धक्कादायक बाब आहे. याबाबत प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यानी प्रतिसाद दिला नाही.
वेर्णा येथे मेळाव्यात मार्गदर्शन केल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत उद्या मंगळवारी राजकीय व्यवहार समितीची (पीएसी) बैठक होत आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने रणनितीवर चर्चा होणार आहे. काँग्रेसचे आमदार, प्रदेश अध्यक्ष तशेच बीएलए हे पीएसीचे सदस्य आहेत.
युतीच्या बोलणीसाठी समिती स्थापन करण्यासह काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विरोधी पक्षांच्या युतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय समितीच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. यानंतर पक्षाने आरजीला चर्चेचे पत्रही पाठविले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भेटीनंतर प्रदेश काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे असतानाच १०८ बीएलएनी राजीनामा दिला आहे.


