भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; स्मृती इराणी सरचिटणीस तर वसुंधरा राजेंची उपाध्यक्षपदी नियुक्ती

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी नवी कार्यकारिणी जाहीर केली. यात १३ उपाध्यक्ष, ८ सरचिटणीस आणि १६ सचिव असून वसुंधरा राजे, राम माधव, स्मृती इराणींना प्रमुख जबाबदाऱ्या मिळाल्या. आयटी सेलच्या नेतृत्त्वात बदल झाला असून अमित मालवीय यांना हटवत दीपक म्हस्के यांची वर्णी लागली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
10 mins ago
भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; स्मृती इराणी सरचिटणीस तर वसुंधरा राजेंची उपाध्यक्षपदी नियुक्ती

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे सर्वांत तरुण राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या मध्यवर्ती संघटनेत मोठा फेरबदल करत नव्या टीमची घोषणा केली आहे. या नवीन रचनेत अनुभव आणि युवा नेतृत्वाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय सरचिटणीस आणि १६ राष्ट्रीय सचिवांसह विविध मोर्चांच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नितीन नवीन यांनी केलेला हा पहिलाच मोठा संघटनात्मक फेरबदल असून, याद्वारे पक्षाने आगामी राजकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आपली नवी बांधणी स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, ते पक्षाला अधिक मजबूत करतील आणि जनसेवेला प्राधान्य देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

या संघटनात्मक फेरबदलात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, बैजयंत जय पांडा, रेखा वर्मा आणि तारिक मन्सूर यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी, वरिष्ठ नेते राम माधव यांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून संघटनेत पुनरागमन झाले असून तीरथसिंग रावत, डी. पुरंदेश्वरी, वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी, भारती प्रवीण पवार, मनप्रीत सिंग बादल, लालसिंग आर्य, एम. नागराजा आणि मधुचंद्र कर या नव्या चेहऱ्यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, सौदान सिंग, सरोज पांडे, डी. के. अरुणा, एम. चुबा आओ, अब्दुल्ला कुट्टी, लक्ष्मीकांत वाजपेयी आणि लता उसेंडी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना उपाध्यक्ष पदावरून वगळण्यात आले आहे.

राष्ट्रीय सरचिटणीसपदाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर एकूण आठ नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना राष्ट्रीय सरचिटणीस करून संघटनेत महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत विनोद तावडे, सुनील बन्सल, बिप्लव कुमार देव, सतीश पुनिया, गजेंद्र पटेल, हरिश द्विवेदी आणि संजय भाटिया यांचा सरचिटणीस मंडळात समावेश आहे. बी. एल. संतोष हे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) या पदावर कायम राहतील, तर शिवप्रकाश आणि सौदान सिंग यांच्याकडे सह-सरचिटणीस (संघटन) पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. याशिवाय के. कविता पाटीदार, के. सुरेंद्रन, भोला सिंग, प्रदीप वर्मा, फांगनॉन कोन्याक, अनिल अँटोनी, संदीप पाठक आणि मनोज तिग्गा यांची राष्ट्रीय सचिव म्हणून निवड झाली असून पीयूष गोयल यांना राष्ट्रीय कोषाध्यक्ष आणि तरुण चुग यांना केंद्रीय कार्यालय प्रभारी करण्यात आले आहे.

या फेरबदलातील सर्वांत महत्त्वाचा आणि लक्षवेधी निर्णय म्हणजे पक्षाच्या डिजिटल व मीडिया रणनीतीत केलेला बदल होय. दीर्घकाळ भाजपच्या आयटी सेलची जबाबदारी सांभाळणाऱ्या अमित मालवीय यांना या पदावरून हटवण्यात आले असून, त्यांच्या जागी छत्तीसगडचे दीपक म्हस्के यांची नवी आयटी सेल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल बलोजी हे मीडिया प्रभारी म्हणून कार्यरत राहतील. सोशल मीडिया आणि डिजिटल प्रचाराचे महत्त्व लक्षात घेता आयटी सेलच्या नेतृत्वात केलेला बदल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, या संघटनात्मक फेरबदलाची वेळ अत्यंत निर्णायक आहे. २०२७ मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि गोवा यांसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. तसेच, नीट (NEET) परीक्षेचा वाद आणि इतर सामाजिक-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाने केंद्र व राज्य घटकांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी ही पावले उचलली आहेत. तरुण आणि अनुभवी नेत्यांची सांगड घालत, महिला आणि प्रादेशिक प्रतिनिधित्वाला दिलेले स्थान आगामी राजकीय संघर्षासाठी भाजपची रणनीती स्पष्ट करणारे ठरते.

हेही वाचा
सर्व पहा