'विमल इलायची'ची सरोगेट जाहिरात भोवली; शाहरुख खान, अजय देवगण अन् टायगर श्रॉफला एफडीएची नोटीस

'विमल इलायची'च्या सरोगेट जाहिरातीप्रकरणी एफडीएने अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावून १५ दिवसांत लेखी स्पष्टीकरण मागवत जाहिराती तातडीने थांबवण्याचे कठोर आदेश दिले आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
16th August, 04:54 pm
'विमल इलायची'ची सरोगेट जाहिरात भोवली; शाहरुख खान, अजय देवगण अन् टायगर श्रॉफला एफडीएची नोटीस

मुंबई : तंबाखूजन्य उत्पादने आणि प्रतिबंधित पदार्थांच्या अप्रत्यक्ष (सरोगेट) जाहिरातींविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आक्रमक पाऊल उचलले आहे. प्रसिद्ध 'विमल इलायची' ब्रँडच्या जाहिरातीत सहभागी असल्याप्रकरणी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना एफडीएने कारणे दाखवा नोटीस बजावली असून १५ दिवसांत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभरात सुरू असलेल्या धडक मोहिमेचाच हा एक भाग मानला जात आहे.



११ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटीसमध्ये एफडीएच्या ग्रेटर मुंबई विभागाने प्रथमदर्शनी संशय व्यक्त केला आहे की, 'विमल इलायची' या नावाखाली प्रत्यक्षात 'विमल पान मसाला' या प्रतिबंधित आणि तंबाखूजन्य ब्रँडचेच अप्रत्यक्ष प्रमोशन केले जात आहे. 'विमल' हे नाव सर्वसामान्यांच्या मनात मुख्यत्वे पान मसाल्याशी जोडलेले असल्याने, केवळ इलायचीच्या नावाने जाहिरात करून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. यामुळे मूळ ब्रँडची ओळख आणि आकर्षण बाजारात कायम ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

या नोटीसद्वारे तिन्ही अभिनेत्यांना नोटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत आपले लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ही नोटीस 'अंतिम इशारा' असल्याचे स्पष्ट करत, निर्धारित वेळेत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुढील कोणतीही पूर्वसूचना न देता थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही देण्यात आला आहे. या कारवाईची माहिती केंद्रीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणासह (FSSAI) केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला (CCPA) देखील पाठवण्यात आली आहे.

एफडीएने केवळ स्पष्टीकरणच मागितले नसून, तिन्ही अभिनेत्यांना 'विमल'शी संबंधित सर्व जाहिराती आणि प्रमोशन तातडीने थांबवण्याचे कडक आदेश दिले आहेत. तसेच त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरून प्रमोशनल साहित्य तात्काळ हटवण्यास सांगितले आहे. 'विमल इलायची' हे बाजारात स्वतंत्रपणे उपलब्ध असलेले उत्पादन आहे की सरोगेट प्रमोशन, याचा पुरावा देण्यासोबतच, अभिनेत्यांचे एंडोर्समेंट करार, मानधन आणि जाहिरात करण्यापूर्वी केलेली पडताळणी यांची सर्व कागदपत्रे प्रशासनाने मागवली आहेत.

हेही वाचा
सर्व पहा