'वंदे मातरम'चा अनादर केल्याप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

राजस्थानच्या चित्तोडगड येथील रॅलीत गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस व सोनिया गांधी यांच्यावर स्वातंत्र्यदिनी 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत अर्ध्यावर थांबवून त्याचा अनादर केल्याचा गंभीर आरोप करत देशाची माफी मागण्याची मागणी केली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
16th August, 03:53 pm
'वंदे मातरम'चा अनादर केल्याप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

चित्तोडगड : काँग्रेस पक्षाने आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी स्वातंत्र्यदिनी 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताचा अनादर केला असून, या कृत्याबद्दल त्यांनी संपूर्ण देशाची बिनशर्त माफी मागितली पाहिजे, असा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. राजस्थानमधील चित्तोडगड येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. केवळ मतांच्या लालसेपोटी काँग्रेस पक्ष 'वंदे मातरम'चा इतिहास आणि सन्मान विसरल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली.

सभेत बोलताना अमित शाह म्हणाले, काँग्रेसचा वागणं पहा! काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत गायले जात होते. हे गीत सुरू असतानाच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षांना ते गाणे थांबवण्यास सांगितले. आम्ही सर्वांनी हे दृश्य दूरचित्रवाणीवर उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.

सोनिया गांधींवर निशाणा साधत शाह पुढे म्हणाले, सोनियाजी, देशातील १४० कोटी जनता तुमच्या या कृत्याकडे पाहत आहे. तुम्ही केलेले हे पाप या देशातील जनता कधीही माफ करणार नाही. 'वंदे मातरम'सारखे राष्ट्रीय गीत अर्ध्यावर अपूर्ण सोडण्याचा विचार तरी कोणी कसा काय करू शकतो? काँग्रेसच्या नेत्यांना या कृत्याची लाज वाटली पाहिजे.

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय गीताचा अपमान करून काँग्रेसने देशाच्या भावना दुखावल्या असून, या संदर्भात काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाने देशवासीयांची तातडीने माफी मागावी, असा पुनरुच्चार अमित शाह यांनी आपल्या भाषणात केला.

हेही वाचा
सर्व पहा