कोकण रेल्वेला या वर्षी १९९.६३ कोटींचा निव्वळ नफा; वाहतूक महसुलात ६ टक्क्यांची वाढ

कोकण रेल्वेने २०२५-२६ आर्थिक वर्षात १९९.६३ कोटींचा नफा मिळवला असून वाहतूक महसूल ९४३.७४ कोटींवर पोहोचला. विनातिकीट प्रवाशांकडून १६.६० कोटी दंड वसूल केला असून, प्रवासी सुविधांसाठी १०५ कोटी खर्च केले जातील.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
कोकण रेल्वेला या वर्षी १९९.६३ कोटींचा निव्वळ नफा; वाहतूक महसुलात ६ टक्क्यांची वाढ

मडगाव : कोकण रेल्वे प्रशासनाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात १९९.६३ कोटी रुपयांचा घवघवीत निव्वळ नफा कमावला आहे. या काळात वाहतूक महसूल ९४३.७४ कोटी रुपयांवर पोहोचला असून, त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच विनातिकीट प्रवासी तपासणी मोहिमेतून गेल्या वर्षीपेक्षा १४ टक्के जास्त, म्हणजेच १६.६० कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. याशिवाय ३४.१२ कोटी मूल्याच्या भंगार विक्रीसह इतर बाबींमधून ३९.०५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली.

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष झा यांनी कोकण रेल्वेच्या विकासात आणि उत्कृष्ट सेवेत योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निष्ठेचे कौतुक केले. या वेळी त्यांनी गेल्या वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या २५ टक्क्यांच्या ध्येयापेक्षा जास्त, म्हणजेच स्थानिक व लघुउद्योगांकडून ५५.५० टक्के खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. सीएसआर (CSR) उपक्रमांतर्गत रत्नागिरी आणि कारवार परिसरातील २५ शाळांना ५५ संगणक व २२ प्रिंटर्स, तर १५ महाविद्यालयांना १८ डिजिटल स्मार्ट स्क्रीन्सचे वाटप करण्यात आले.

मडगावातील जुना पूल हटवला; पथकाला ३ लाखांचे पारितोषिक

विविध विभागांच्या समन्वयाने मडगाव जंक्शनवरील जुना पादचारी पूल हटवण्याचे कठीण काम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल संबंधित टीमला ३ लाख रुपयांचे सामूहिक पारितोषिक जाहीर करण्यात आले. याशिवाय रेल्वे ऑपरेशन्स सुरक्षित ठेवून प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या १२ सतर्क कर्मचाऱ्यांना वैयक्तिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २१ पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट पूर्ण करून त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच ११ किमी सीटीआर आणि २१ किमी सीआरआरची कामे पूर्ण झाल्याने वेल्ड फेल्युअरचे प्रमाण ४६ टक्क्यांनी घटले आहे.

नव्या गाड्यांची वाढ व प्रवासी सुविधांसाठी १०५ कोटी

नव्या रेल्वे गाड्या, त्यांच्या फेऱ्या आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करताना गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये ८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत एकूण १०,३१३ प्रवासी गाड्या, २४५ उन्हाळी विशेष गाड्या आणि ३,७८५ मालगाड्या चालवण्यात आल्या. चालू आर्थिक वर्षात प्रवाशांच्या सोयी-सुविधांसाठी २०.५३ कोटी रुपये खर्च केले जाणार असून, आगामी ३ वर्षांच्या कालावधीत सुमारे १०५ कोटी रुपये प्रवासी सुविधांवर खर्च केले जातील.

१९६ सीसीटीव्ही अन् वैद्यकीय व्हॅनला ड्रोन कॅमेरे

रेल्वे अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीचे जलद हवाई मूल्यमापन करण्यासाठी अपघात मदत वैद्यकीय व्हॅनला आधुनिक ड्रोन कॅमेरे पुरवण्यात आले आहेत. वेर्णा येथे १४० टनांच्या ब्रेकडाऊन ट्रेनसाठी विशेष सुविधा उभारण्यात आली आहे. १० स्थानकांवर आणि एका हाल्टवर मिळून एकूण १९६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

प्रवाशांसाठी ट्रान्झिट लाउंज अन् विशेष इन्स्पेक्शन अ‍ॅप

मडगाव व थिवीसह उडुपी आणि बैंदूर येथे ट्रान्झिट लाउंज, तर सुरतकल व रत्नागिरी येथे 'रेल आर्केड' विकसित करण्यात आले आहेत. दिव्यांग व ज्येष्ठांच्या सोयीसाठी १३ स्थानकांवर टॅक्टाईल टाईल्स बसवण्यात आल्या आहेत. थिवी व उडुपी येथे कोच गायडन्स सिस्टीम सुरू झाली आहे. रेल्वे पाहणीदरम्यान आढळणाऱ्या त्रुटींचा छायाचित्र स्वरूपात रेकॉर्ड ठेवण्यासाठी ऑफलाईन काम करणारे 'केआर इन्स्पेक्शन अ‍ॅप' विकसित करण्यात आले आहे.

आरपीएफकडून ५६ अल्पवयीन मुलांची सुटका

कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) चमकदार कामगिरी केली आहे. 'ऑपरेशन अमानत'अंतर्गत २०६ प्रवाशांचे ९०.५५ लाख रुपये किमतीचे हरवलेले साहित्य परत करण्यात आले. 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते'अंतर्गत ५६ अल्पवयीन मुलांची सुटका करून त्यांना बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले, तर 'ऑपरेशन सतर्क'अंतर्गत ३,८१३ बेकायदेशीर दारूच्या बाटल्या जप्त करून २४ तस्करांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा
सर्व पहा