'वंदे मातरम'वरून विरोधकांवर निशाणा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा काँग्रेसवर प्रहार

स्वातंत्र्यदिनादिवशी काँग्रेस मुख्यालयात पूर्ण 'वंदे मातरम' गायनावर नेत्यांनी आक्षेप घेतल्याने पेटलेल्या वादावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवर राष्ट्रगीताचा अनादर केल्याचा घणाघाती आरोप करून सडकून आणि कडक टीका केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
39 mins ago
'वंदे मातरम'वरून विरोधकांवर निशाणा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा काँग्रेसवर प्रहार

पणजी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीतावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. काल स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहणादरम्यान पूर्ण 'वंदे मातरम' गायले जात असताना सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी ते थांबवण्याचे इशारे केले, तरीही पूर्ण गायन झाले. या घटनेवरून देशभरात नवा राजकीय वाद पेटला असून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी यावर आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. काँग्रेसने प्रदीर्घ काळ देशावर राज्य केले, परंतु त्यांनी राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीताचा सन्मान करण्याऐवजी लोकांच्या भावनांशी खेळ केला, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

डॉ. सावंत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'वंदे मातरम' या मंत्राचा आणि गीताचा खरा सन्मान राखला गेला आहे. ज्या गीताने स्वातंत्र्यलढ्यात हजारो देशभक्तांना प्रेरणा दिली, त्या गीताला योग्य स्थान देण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. काँग्रेसच्या काळात या राष्ट्रीय गीताचा पूर्ण उच्चार न करता किंवा त्याला योग्य सन्मान न देता नेहमी डावलण्यात आले, असेही त्यांनी नमूद केले. गोव्यातील पत्रकारांनी काँग्रेस नेत्यांना याविषयी थेट जाब विचारला पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. दरम्यान उद्या १७ ऑगस्ट रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे गोवाा दौऱ्यावर येत आहेत. काँग्रेस पक्षाची इतर विरोधी पक्षांशी युती, अंतर्गत समस्या आणि इतर संघटनात्मक गोष्टींवर ते राज्यातील काँग्रेस कॅडरशी चर्चा करतील. 

'वंदे मातरम' हे केवळ एक गीत नसून ते देशप्रेमाची आणि समर्पणाची भावना जागवणारा राष्ट्रमंत्र आहे. हे गीत पूर्ण म्हटल्याने कोणाचा काय आक्षेप असू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत सतत पेटती ठेवण्यासाठी 'वंदे मातरम'चे गायन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत, काँग्रेसने या मुद्द्यावर देशातील जनतेला स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा
सर्व पहा