विकसित भारताचे खरे लाभार्थी 'झेन झी' आणि 'झेन अल्फा' : मुख्यमंत्री डॉ. सावंत

पत्रादेवी हुतात्मा स्मारकावर आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'विकसित भारत २०४७' मध्ये युवा पिढीच्या भूमिकेवर भर दिला. २५ ऑगस्टला राजनाथ सिंग यांच्या हस्ते होईल स्मारकाचे अनावरण.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
विकसित भारताचे खरे लाभार्थी 'झेन झी' आणि 'झेन अल्फा' : मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी : मागील पिढ्यांनी देशाच्या आणि गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले असले, तरी आजच्या तरुण पिढीने या त्यागाचे स्मरण करून तंत्रज्ञान, संशोधन आणि नवनिर्मितीच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे. पुढील २५ वर्षे ही आजच्या युवा पिढीचीच असून 'विकसित भारत २०४७' चे खरे लाभार्थी हे 'जेन झी' (Gen Z) आणि 'जेन अल्फा' (Gen Alpha) चे प्रतिनिधित्व करणारी आजची मुलेच असतील, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पत्रादेवी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. 

या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, स्थानिक आमदार प्रवीण अर्लेकर, आमदार जीत आरोलकर, आझाद गोमंतक दल स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष बापू देसाई यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले की, पत्रादेवी येथील पुनर्विकसित हुतात्मा स्मारकाचे काम पूर्ण झाले असून येत्या २५ ऑगस्ट रोजी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते या भव्य प्रकल्पाचे अधिकृत अनावरण करण्यात येणार आहे. भविष्यात हे स्मारक एक प्रमुख देशभक्ती पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाईल, जेणेकरून येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आणि भावी पिढीला गोव्याच्या मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांच्या त्यागाची प्रेरणा मिळेल.

१५ ऑगस्ट १९५५ रोजी मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, लडाख, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांसारख्या विविध राज्यांतील देशभक्तांनी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध पत्रादेवी सीमेवरून गोव्यात प्रवेश केला होता. त्या वेळी पोर्तुगीज सैन्याने केलेल्या बेछूट गोळीबारात अनेक सत्याग्रही धारातीर्थी पडले, ज्यात कर्नल सिंग बेनिपाल हे पहिले हुतात्मा ठरले होते. या ऐतिहासिक त्यागाची दखल घेत ६० वर्षांनंतर गोवा सरकारने मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांच्या प्रथम पिढीतील वारसदारांचा शोध घेऊन त्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे मानधन आणि 'सर्टिफिकेट ऑफ ऑनर' देऊन गौरवले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

स्वातंत्र्यसैनिक आणि  हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करताना मुख्यमंत्र्यांनी आजच्या मुलांनी आणि तरुणांनी देशाचे जबाबदार नागरिक बनून देशभक्तीची भावना जोपासावी असे आवाहन केले. भारत २०४७ पर्यंत पूर्ण विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असून यासाठी युवकांनी इनोव्हेशन, तंत्रज्ञान आणि रिसर्च क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करून वाटेकरी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारत देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले असले तरी गोव्याला मुक्ती मिळण्यासाठी तब्बल १४ वर्षे वाट पाहावी लागली आणि अखेर १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा मुक्त झाला, या ऐतिहासिक संदर्भाचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. या सोहळ्यादरम्यान केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनीही उपस्थितांना संबोधित करत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना व स्वातंत्र्यसैनिकांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

हेही वाचा
सर्व पहा