पक्षाचा आदेश आल्यास फातोर्डातून निवडणूक लढवण्यास तयार : दामू नाईक

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी फातोर्डातून लढण्याची तयारी दर्शवत एसटी आरक्षण प्रक्रियेला गती दिल्याचा दावा केला. तसेच, नाराज नेत्यांशी संवाद साधून अपक्ष लढण्याच्या इशाऱ्यांवर तोडगा काढू, असा विश्वास व्यक्त केला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
22 mins ago
पक्षाचा आदेश आल्यास फातोर्डातून निवडणूक लढवण्यास तयार : दामू नाईक

पणजी: गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी राज्यातील आगामी राजकीय घडामोडी, विविध मतदारसंघांची सद्यस्थिती, आरक्षणाचा मुद्दा आणि स्वतःच्या उमेदवारीबाबत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. फातोर्डा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवर सविस्तर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने राज्यातील सर्व चाळीस मतदारसंघांकडे समान दृष्टीने आणि गांभीर्याने पाहणे ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे. फातोर्डामध्ये पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवून तेथेभारतीय जनता पक्षाचे कमळ फुलवणे हेच सध्याचे मुख्य ध्येय आहे. 

फातोर्डामधून निवडणूक लढवण्याच्या शक्यतेवर बोलताना त्यांनी संकेत दिले की, पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अथवा वरिष्ठ पातळीवरून फातोर्डा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आदेश दिल्यास आपण ती जबाबदारी स्वीकारून निश्चितपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार आहोत. गेल्या ३२ वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात 'राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः' या सिद्धांतानुसार काम केले असून, पक्षाचा निर्णय आपल्यासाठी नेहमीच अंतिम आणि शिरसावंद्य राहील, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

एसटी आरक्षणाची प्रशासकीय प्रक्रिया योग्य दिशेने सुरू

यासोबतच, अनुसूचित जमाती (एसटी) समाजाला राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी 'उटा' (UTTA) संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यानंतरच्या घडामोडींवर दामू नाईक यांनी पक्षाची स्पष्ट बाजू मांडली. आरक्षण प्रक्रियेला विलंब होत असल्याच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले की, कोणतीही प्रशासकीय किंवा सरकारी प्रक्रिया कायदेशीर सिस्टीम आणि नियमांच्या चौकटीतूनच पुढे जाते. काँग्रेस सरकारच्या सत्ताकाळात या आरक्षणाच्या मागणीवर कोणतीही ठोस पावले उचलली गेली नव्हती; मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारनेच या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने गती दिली आहे. एसटी आरक्षणाच्या अधिसूचनेनंतरची पुढील प्रशासकीय प्रक्रिया सध्या योग्य दिशेने सुरू असून, सेन्सस कमिशनर आणि इतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत आवश्यक तो पाठपुरावा सातत्याने केला जात आहे. 

याच दरम्यान भंडारी समाजाकडून समोर आलेल्या आरक्षणाच्या मागणीबाबत विचारले असता, हा विषय पूर्णपणे सरकारी पातळीवरील आणि मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाकडे थेट अशी कोणतीही मागणी आलेली नसली, तरीही पक्षाचा कोणताही महत्त्वाचा निर्णय हा पक्षाचे थिंक टँक, वरिष्ठ नेते आणि केंद्रीय नेतृत्वाच्या विचारविनिमयातूनच घेतला जातो. भाजपमध्ये कोणत्याही प्रकारचा मनभेद किंवा मतभेद नसून पक्ष पूर्ण एकमताने आणि मजबुतीने पुढे जात आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नाराज नेत्यांशी संवाद साधून पक्षातील प्रश्न सोडवले जातील

दुसऱ्या बाजूला, आगामी निवडणुकीत तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेत देणाऱ्या पक्षातील काही वरिष्ठ आणि माजी नेत्यांच्या इशाऱ्यांवर दामू नाईक यांनी अत्यंत संयमी व राजकीय परिपक्वतेची प्रतिक्रिया दिली. तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष लढण्याची भाषा करणे ही गोव्याच्या राजकीय इतिहासात कोणतीही नवी गोष्ट नाही, असा टोला त्यांनी लगावला. आपल्या ३० वर्षांहून अधिक काळाच्या राजकीय प्रवासात प्रत्येक निवडणुकीत आणि मतदारसंघात अशा प्रकारच्या राजकीय घडामोडी त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. 

भूतकाळात दिवंगत नेते मनोहर पर्रीकर, राजेंद्र आर्लेकर आणि सध्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भाजपने अशा अंतर्गत आव्हानांवर व असंतोषावर नेहमीच यशस्वीपणे मात केली आहे. पक्षसंघटन अत्यंत मजबूत असून, पक्षातील नाराज नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी योग्य वेळी संवाद साधून सर्व प्रश्न सामंजस्याने सोडवले जातील. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पक्षाचा विजय संकल्प साध्य करणे हेच भारतीय जनता पक्षाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सरतेशेवटी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा