मडगाव :रस्ता अपघातात गंभीर जखमी होऊन ६८ टक्के कायमस्वरूपी शारीरिक अपंगत्व आलेल्या कासावली येथील राजू कुमार याला मडगाव मोटार अपघात दावा न्यायालयाने ९४.३९ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. न्यायालयाचे न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांनी हा निवाडा देताना, दावा दाखल केल्याच्या तारखेपासून या रकमेवर वार्षिक ७ टक्के दराने व्याज देण्याचेही आदेश दिले आहेत.
२०१८ मध्ये अपघात, डोक्याला गंभीर दुखापत
१५ डिसेंबर २०१८ रोजी कासावली येथील सेंट जोसेफ हायस्कूलजवळ हा अपघात झाला होता. त्यावेळी अवघ्या १० वर्षांचा राजू कुमार रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत होता. त्याचवेळी यासिन अब्दुल ओलेकर याने भरधाव वेगाने दुचाकी चालवून राजूला धडक दिली. या धडकेत राजू रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातामुळे राजूच्या मेंदूच्या उजव्या भागाला गंभीर इजा झाली. परिणामी त्याच्या शरीराचा डावा भाग अर्धांगवायूमुळे निकामी झाला. या दुखापतीमुळे त्याला कायमस्वरूपी शारीरिक अपंगत्व आले.
न्यायालयाने राजूची भविष्यातील कमावण्याची क्षमता शंभर टक्के संपल्याचे गृहीत धरून भरपाई निश्चित केली. भविष्यात दोन-तीन दशकांनंतर महागाई किती वाढेल, हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे ९४.३९ लाख रुपयांची रक्कम सध्याच्या तुलनेत मोठी वाटत असली तरी मुलाच्या आजीवन गरजा आणि वैद्यकीय उपचारांचा विचार करता ती न्याय्य असल्याचे निरीक्षण न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांनी आदेशात नोंदवले.
दुचाकी चालक यासिन ओलेकर, वाहन मालक रेहाना ओलेकर आणि ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’ कंपनी या तिघांना न्यायालयाने संयुक्तपणे भरपाई देण्यास जबाबदार धरले आहे. विमा कंपनीने वाहन चालकाकडे वैध परवाना नसल्याचा दावा केला होता. मात्र, हा दावा न्यायालयात सिद्ध करण्यात कंपनीला यश आले नाही.
राजूचे भविष्यातील आयुष्य, वाढती महागाई आणि वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन न्यायालयाने ९४.३९ लाख रुपयांच्या भरपाईचे नियोजन केले आहे.
रोख रक्कम : ४,३९,६६७ रुपये पालकांना सुपूर्द केले जातील.
मासिक उत्पन्नासाठी : ४० लाख रुपये राष्ट्रीयीकृत बँकेत मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवले जातील. त्यावर मिळणारे व्याज दरमहा राजूच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
भविष्यातील तरतूद : ५० लाख रुपये व्याजासह चक्रवाढ पद्धतीने बँकेत मुदत ठेव म्हणून सुरक्षित ठेवले जातील.


