वास्को : वेर्णा औद्योगिक वसाहतीतील बीएलएस पॉलिमर्स लिमिटेड कंपनीकडून प्रक्रिया करण्यासाठी देण्यात आलेल्या एचडीपीई साहित्यापैकी सुमारे १०,९६९ किलो साहित्य परत न करता अपहार केल्याची तक्रार वेर्णा पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीला ८.९४ लाखांचा फटका बसला. याप्रकरणी हाना ट्रेडर्सचे मालक अब्दुल कलाम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कंपनीचे प्रतिनिधी जॉयदीप गुहा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ फेब्रुवारी २०२४ ते १४ मार्च २०२४ या कालावधीत विविध तारखांना कंपनीने अब्दुल कलाम याच्याकडे एकूण २२,८८० किलो एचडीपीई लंप्स प्रक्रिया करण्यासाठी सोपविले होते. यासाठी संबंधित डिलिव्हरी चलन आणि ई-बिले देण्यात आली होती.
ठरलेल्या सेवाशुल्काच्या बदल्यात साहित्य ग्राइंडिंग करून प्रक्रिया केलेले साहित्य कंपनीला परत करणे अपेक्षित होते. मात्र, संशयिताने यापैकी केवळ ११,१९१ किलो साहित्यावर प्रक्रिया करून ते कंपनीला परत केले. उर्वरित १०,९६९ किलो साहित्य, ज्याची अंदाजे किंमत ७ लाख १५ हजार ७८५ रुपये आहे. त्यावर प्रक्रियाही केली नाही आणि कंपनीला परत केले नाही.
तक्रारीनुसार, संशयिताने कंपनीकडून १ लाख ५४ हजार ६०५ रुपये सेवाशुल्कही स्वीकारले. त्यानंतरही कंपनीकडे शिल्लक साहित्य परत न करता त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे कंपनीचे एकूण अंदाजे ८ लाख ९४ हजार ७३१ रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी वेर्णा पोलीस पुढील तपास करीत आहेत.


