आदिवासी समाजाला कोणीही गृहित धरू नये!

म्हार्दोळ येथील महामेळाव्यात एसटी बांधवांचा इशारा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
36 mins ago
आदिवासी समाजाला कोणीही गृहित धरू नये!

फोंडा : एसटी समाजाला राजकीय आरक्षणाची आठवण सरकारला करून देण्यासाठी या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कारण राजकीय आरक्षण प्राप्त होणे ही काळाची गरज आहे. आदिवासी समाजाला  कोणीही गृहित धरू नये, असा इशारा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी एसटी बांधवांच्यावतीने दिला.

म्हार्दोळ येथील युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर गुरुवारी उटाच्या महामेळाव्यात आमदार गोविंद गावडे बोलत होते. यावेळी आमदार आंतोन वाझ, माजी आमदार वासू मेंग गावकर, उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, गोविंद शिरोडकर, दुर्गादास गावडे, विश्वास गावडे व अन्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजकीय आरक्षण २०२७ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लागू करणे अत्यंत गरज आहे. एसटीसाठी लागू झालेल्या योजना हे समाज बांधवाच्या कष्टाचे फळ आहे, असे आमदार गोविंद गावडे यांनी सांगितले.

राजकीय आरक्षणाच्या त्वरित कार्यवाहीसाठी एसटी समाजाची ताकद व ऐक्य याचे दर्शन सरकारला घडावे म्हणून मेळाव्याचे आयोजन केले आहे. दोन महिन्यांत ‘एसटी’ आरक्षणाची कार्यवाही करावी, असे उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी सांगितले.

आरक्षणाची प्रक्रिया ‘फास्ट ट्रॅक’ करावी!

सत्ता असतानाही एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्यात इतका विलंब का झाला? मुख्यमंत्र्यांनी ‘थिंक टँक’चा सल्ला न घेता त्यांना बाजूला ठेवावे व आरक्षणाची प्रक्रिया ‘फास्ट ट्रॅक’ करावी, असे आमदार गोविंद गावडे यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा