भाज्या, खतांच्या गाड्यांमधून खव्याची वाहतूक

मडगावात एफडीएची कारवाई : १३० किलो खवा नष्ट

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
40 mins ago
भाज्या, खतांच्या गाड्यांमधून खव्याची वाहतूक

मडगावात एफडीए पथकाने जप्त केलेला खवा व इतर साहित्य.

मडगाव : सासष्टीतील अन्न व औषध खात्याच्या (एफडीए) पथकाने मडगाव येथे परराज्यांतून येणाऱ्या वाहनांची तपासणी करत मोठी कारवाई केली. भाज्या, खते आणि इतर कच्चा माल वाहून नेणाऱ्या गाड्यांमधून अयोग्य पद्धतीने खव्याची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा १३० किलो खवा जप्त करून नष्ट करण्यात आला.
आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खवा, मावा, पनीर, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्यासाठी एफडीएने मडगाव परिसरात गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. दक्षिण गोवा एफडीएच्या अधिकारी संज्योत कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
परराज्यांतून येणाऱ्या वाहनांची तपासणी करताना भाज्या, खते आणि इतर कच्चा माल वाहून नेणाऱ्या वाहनांमधून अत्यंत चुकीच्या पद्धतीने तसेच अयोग्य तापमानात खवा आणला जात असल्याचे उघड झाले. त्यामुळे १३० किलो खवा जप्त करून तो नष्ट करण्यात आला. या मोहिमेदरम्यान एकूण सहा अन्न उत्पादन घटकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन ठिकाणी अस्वच्छ वातावरणात काम सुरू असल्याचे आढळल्याने संबंधितांना तपासणी अहवाल बजावण्यात आला.
मडगावच्या माडेल भागात सुरू असलेल्या एका समोसा उत्पादन युनिटवरही एफडीएने छापा टाकला. हे युनिट कोणत्याही वैध अन्न परवान्याशिवाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वैध परवाना मिळेपर्यंत युनिटचे काम तातडीने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
या कारवाईत वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी प्रिया डी., अन्न सुरक्षा अधिकारी प्रिया के., अमरदीप जी., अभिषेक एन., एमटीएस गौरेश जी. आणि चालक डोमिंगो जी. यांनी सहभाग घेतला. सणासुदीच्या काळात नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले.
दोन रेस्टॉरंटना सुधारणा नोटीस
कदंब बसस्थानक परिसरातील दोन रेस्टॉरंट्सचीही तपासणी करण्यात आली. अस्वच्छ स्थितीत आस्थापने चालवली जात असल्याचे आढळल्याने त्यांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली. तसेच कोटपा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित हॉटेल्सना प्रत्येकी ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.            

हेही वाचा
सर्व पहा