उगवे येथील वळणावर भरधाव कारच्या भीषण अपघातात सहा पर्यटक जखमी

न्हयबागहून पत्रादेवीच्या दिशेने जाताना अपघात; जखमींना रुग्णालयात दाखल

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
09th August, 11:38 pm
उगवे येथील वळणावर भरधाव कारच्या भीषण अपघातात सहा पर्यटक जखमी

उगवे येथे अपघातात सापडलेले वाहन. (निवृत्ती शिरोडकर)

पेडणे : न्हयबागहून पत्रादेवीच्या दिशेने जाणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओला उगवे येथे रविवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याबाहेर जाऊन उलटले. या अपघातात चालकासह वाहनातील सहा जण जखमी झाले.‍‍
महिंद्रा स्कॉर्पिओ (केए४९-एन-२००५) रविवारी सायंकाळी सुमारे ६.३० वा. उगवे येथील तीव्र वळणावर आली असता चालकाचा ताबा सुटला. वाहनाचा वेग अधिक असल्याने ते रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातात चालक रोशन (२१, निपाणी, कर्नाटक) याच्यासह प्रथम चंदूरकर, प्रथमेश मन्सुले, प्रतीक गोळेकर, गुरिश अंकुशे आणि शुभम रणदिवे हे प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची नोंद करून तपास सुरू करण्यात आला आहे. वाहनाचा वेग, तीव्र वळण आणि चालकाचा ताबा सुटण्याचे नेमके कारण याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

क्रॅश बॅरियरची मागणी
उगवे परिसरातील तीव्र वळणांवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक वाहन चालविण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. अपघातांची वारंवारता लक्षात घेता या ठिकाणी क्रॅश बॅरियर उभारावेत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.      

हेही वाचा
सर्व पहा