गोवन वार्ता प्रतिनिधी
मडगाव : केंद्र सरकारने गोव्यात अनुसूचित जमातीसाठी (एसटी) ४ विधानसभा मतदारसंघ राखीव ठेवण्याची अधिसूचना जारी केली आहे. दक्षिण गोव्यातील सांगे, केपे आणि नुवे मतदारसंघ आरक्षणाच्या परिघात आल्यास एसटी समाजातील नव्या चेहर्यांना संधी मिळू शकेल.
एसटी राजकीय आरक्षणाची प्रक्रिया २०२७ आधी पूर्ण झाल्यास आगामी निवडणुकीतील समीकरणे बदलणार आहेत. विद्यमान बिगरएसटी आमदारांच्या राजकीय प्रवासाला खीळ बसणार आहे. सांगेतील विद्यमान आमदार सुभाष फळदेसाई यांनी राजकीय आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. पक्षाच्या आदेशानुसार ते जागा सोडण्यास आणि एसटी उमेदवाराचा प्रचार करण्यास तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र, बिगरएसटी मतदारांनी फळदेसाई यांच्यासह भाजपच्या वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केली आहे.
सांगेचे माजी आमदार प्रसाद गावकर यांनी सांगितले की, एसटी आरक्षणाची प्रक्रिया निवडणूकपूर्वी पूर्ण होण्याची गरज आहे. २०१२ मध्ये मी निवडणूक लढवली होती. २०१७ मध्ये सांगेतून अपक्ष निवडून आलो होतो. आरक्षण असले किंवा नसले तरी आपण पुन्हा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
केपे मतदारसंघात सध्या एल्टन डिकॉस्टा हे काँग्रेसचे आमदार आहेत. केपे राखीव झाल्यास डिकॉस्टा यांना तेथून निवडणूक लढवता येणार नाही. केपेतून ज्येष्ठ एसटी नेते आणि माजी आमदार प्रकाश वेळीप भाजप किंवा अपक्ष म्हणून मुख्य दावेदार मानले जात आहेत. नुवे मतदारसंघ चौथी राखीव जागा ठरण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास विद्यमान आमदार आलेक्स सिक्वेरा (भाजप) यांना निवडणुकीसाठी दुसरा मतदारसंघ शोधावा लागेल. नुवे राखीव झाल्यास माजी आमदार विल्फ्रेड डिसा आणि लिंडन मोंतेरो यांनाही रिंगणातून बाहेर रहावे लागेल. सीमांकन आयोगाकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर एसटी राखीव मतदारसंघांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

काणकोण राखीव झाल्यास इजिदोरसह अनेकांना फटका
दीर्घकाळापासून नुवे एसटीसाठी राखीव असेल, अशी चर्चा होती. मात्र, काणकोण येथील एसटींची लोकसंख्याही मोठी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, केपे, सांगे, प्रियोळनंतर काणकोणमध्ये एसटी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक सुमारे १३,६५७ आहे. काणकोणमधील खोला गाव केपे मतदारसंघात समाविष्ट केल्यानंतरही, काणकोणमधील एसटी लोकसंख्या सुमारे १०,६८० राहते. याउलट, नुवेत एसटी लोकसंख्या ९,१२७ च्या आसपास आहे. त्यामुळे चौथा राखीव मतदारसंघ काणकोण होण्याची शक्यता अधिक आहे. काणकोण राखीव झाल्यास माजी आमदार इजिदोर फर्नांडिस, जनार्दन भंडारी, चेतन देसाई, प्रशांत नाईक या इच्छुकांना निवडणूक लढवता येणार नाही.


