पक्षाकडून माझ्यावर अन्याय होणार नाही अशी अपेक्षा : मंत्री सुभाष फळदेसाई

सांगे मतदारसंघातील आरक्षणाच्या घडामोडींवर आणि कुडचडेतील राजकीय वातावरणावर सुभाष फळदेसाईंचे भाष्य; ३० वर्षांच्या निष्ठेचा दिला दाखला

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
57 mins ago
पक्षाकडून माझ्यावर अन्याय होणार नाही अशी अपेक्षा : मंत्री सुभाष फळदेसाई

पणजी :  गोव्यातील अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाचे अंतिम नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर राज्यभरात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. सांगे मतदारसंघ आरक्षित होण्याची शक्यता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पक्षांतर्गत संवाद व भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत मोठे वक्तव्य केले. गेल्या ३० वर्षांपासून पक्षासाठी घेतलेल्या अफाट मेहनतीची आणि निष्ठेची दखल घेत भारतीय जनता पक्ष आपल्यावर कोणताही अन्याय करणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सांगे मतदारसंघात आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, आज सकाळी समर्थकांनी मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी एकत्र येत पाठिंबा दर्शवला.

शनिवारी कुडचडे येथे देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले असता कुडचडे मतदारसंघाच्या सीमेवर कार्यकर्त्यांची अचानक गर्दी झाली आणि त्यावरून प्रसारमाध्यमांत वेगवेगळ्या चर्चा रंगवल्या गेल्या, असे स्पष्टीकरण सुभाष फळदेसाई यांनी दिले. कुडचडे ही आपली जन्मभूमी असून तेथे आपले बालपण, शिक्षण आणि कौटुंबिक नातेसंबंध जोडलेले आहेत. १९९४ साली आपण या भागात पक्षासाठी मोठे काम केले होते. त्यामुळे कुडचडे क्षेत्राशी आपला जुना संबंध असला तरी पक्षाच्या अधिकृत सूचनेशिवाय किंवा निर्णयाशिवाय कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कुडचडे मतदारसंघात काही स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या दौऱ्याला विरोध करत वक्तव्ये केली आणि बॅनरबाजी केली, यावर फळदेसाई यांनी खेद व्यक्त केला. पक्षात असताना एका विद्यमान मंत्र्याविरोधात जाहीर भूमिका घेणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. पक्षाने नेहमीच शिस्तीचा पाठपुरावा केला पाहिजे आणि सर्वांना समान न्याय दिला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. सांगेतील जनतेने आपल्याला पाच वर्षांसाठी निवडून दिले असून, सरकार आणि पक्ष संघटना जी जबाबदारी देईल ती आपण प्रामाणिकपणे पार पाडण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करून देताना सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, १९९६ मध्ये जेव्हा सांगे भागात भाजपचा एकही कार्यकर्ता नव्हता, तेव्हापासून त्यांनी पक्षाचे काम सुरू केले आणि हजारो सदस्यांची नोंदणी केली. गोव्याव्यतिरिक्त महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी महिने न महिने घरापासून दूर राहून पक्षाचे काम केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी आपले अत्यंत चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत पक्षाने आगामी राजकीय निर्णयाबाबत आपल्याशी योग्य संवाद साधावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आपण सत्तेच्या किंवा पदाच्या लालसेने नव्हे, तर जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आहोत, असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.


हेही वाचा
सर्व पहा