दामू नाईक यांच्या विधानामुळे सांगेत भाजप कार्यकर्त्यांचा संताप

दामू नाईक यांनी मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर कारवाई करण्याचे विधान केल्यामुळे सांगेतील मतदारांत संताप. सुभाष फळदेसाई यांनी कुडचडेत जाऊ नये, दामू नाईक यांनी त्वरित माफी मागावी अशा मागणी सांगेतील कार्यकर्त्यांनी केली आहे. फळदेसाईंच्या निवासस्थानी शेकडो समर्थकांचा ठिय्या

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
43 mins ago
दामू नाईक यांच्या विधानामुळे सांगेत भाजप कार्यकर्त्यांचा संताप

पणजी : सांगेचे आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच शेकडो कार्यकर्ते व स्थानिक मतदारांनी गर्दी करत ठाण मांडले आहे. फळदेसाई यांनी सांगे सोडून कुडचडेत जाण्याचा विचारही करू नये, अशी आक्रमक भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी फळदेसाई यांच्यावर कारवाई करण्याचे वक्तव्य केल्याने सांगेतील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी मंत्री फळदेसाई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली भूमिका मांडली, तर दामू नाईक यांनी याप्रकरणी सांगेतील मतदारांची त्वरित माफी मागावी, अशी जोरदार मागणी केली आहे.



तत्पूर्वी, काल दुपारी भाजप कोअर समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी फळदेसाई यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. कुडचडे मतदारसंघातील फळदेसाई यांच्या राजकीय हालचाली भाजप मुळीच खपवून घेणार नाही, असा इशारा नाईक यांनी दिला होता. पक्षाने त्यांना अशा प्रकारचे कोणताही कार्य  करण्याची अधिकृत परवानगी दिली नसून, त्यांनी केलेली कृती चुकीची आहे. कुडचडे येथील राजकीय प्रश्न हा फळदेसाई यांच्याशी थेट चर्चा करून पक्षपातळीवर सोडवला जाईल; परंतु पक्षाच्या चौकटीबाहेर जाणाऱ्या अशा कृती भाजप कधीही सहन करणार नाही, असे नाईक यांनी स्पष्ट केले होते. 



दुसरीकडे, या संपूर्ण घडामोडींवर मंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल सायंकाळी अत्यंत भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. सांगे मतदारसंघात अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडत आहेत. गेल्या काही वर्षांपासून कुडचडेतील नागरिक आणि कार्यकर्ते आपल्याला तेथून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरत आहेत. मात्र, सांगेतील जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास सोडणे सोपे नसले तरी, सध्याच्या राजकीय परिस्थितीत नेमकी कोणती दिशा धरावी याबद्दल प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. आपले सर्व मार्ग बंद झाले असून समोर केवळ अंधार दिसत आहे, अशी धक्कादायक खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, पक्षाने राजकीय वाटचाल थांबवण्याचे संकेत दिल्यास तो निर्णय शिरसावंद्य मानू आणि पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊन कोणतीही भूमिका घेणार नाही, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. फळदेसाई यांच्या या थेट विधानामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.


हेही वाचा
सर्व पहा