मडगाव: सत्तरीच्या तोणीर-काजरेधाट येथील धबधब्यावर बुडून मृत्यू झालेला मुलगा विनातिकीट आणि विनापरवानगी त्या ठिकाणी गेला होता. राज्य सरकारकडून सर्व धोकादायक पाणवठ्यांवर इशारा देणारे फलक लावून पाण्यात न उतरण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या जात आहेत. याशिवाय विविध सुरक्षा उपाययोजनाही केल्या जातात. त्यामुळे या सूचनांचे पालन करणे ही वैयक्तिकरीत्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष देविया राणे यांनी केले.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
मडगाव येथील एका कार्यक्रमादरम्यान तोणीर-काजरेधाट धबधब्यावर वास्कोतील विद्यार्थ्याच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूबाबत पत्रकारांशी बोलताना दिव्या राणे यांनी प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, "विद्यार्थी बुडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शाळेतील मुलांचा एक गट तेथे गेला होता; परंतु संबंधित मुलगा तिकीट न घेता विनापरवानगी तेथे पोहोचला होता."
नियम मोडणारेही अपघातास तितकेच जबाबदार
पुढे स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या की, तो परिसर वन खात्याच्या अखत्यारीत येतो, वन विकास महामंडळाच्या ताब्यात नाही. घटनास्थळी धोकादायक असल्याचा स्पष्ट फलक लावलेला असतानाही अशा दुर्घटना घडतात, हे खेदजनक आहे. राज्य सरकारने पावसाळी पर्यटनासाठी घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने काटेकोर पालन केले पाहिजे. अशा घटना घडल्यास सरकारवर जितकी जबाबदारी येते, तितकेच नियमांचे उल्लंघन करणारे नागरिकही त्याला जबाबदार आहेत.


