धबधब्यावर मृतदेहाचा शोध घेताना वाळपई अग्निशामक दलाचे जवान.
गोवन वार्ता प्रतिनिधी
वाळपई : सत्तरी तालुक्यातील बंदी असलेल्या सावर्डे पंचायत हद्दीतील तोणीर-काजरेधाट धबधब्यावर शुक्रवारी ट्रेकिंगसाठी आलेल्या वास्कोतील दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालय, सडा-बायणा येथील राहुल बिंद (१७) या बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी बंदी असलेल्या धबधब्यावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या शिक्षक, विद्यालय व्यवस्थापन व स्थानिक एजंटांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राहुल बिंद
दीपविहार विद्यालयातील सुमारे ४० विद्यार्थी आणि शिक्षकांचा गट पावसाळी सहलीसाठी सत्तरीत आला होता. वन खात्याने धोकादायक असल्याने तोणीर-काजरेधाट धबधब्यावर प्रवेशास मनाई केली आहे. असे असतानाही हा गट धबधब्यापर्यंत पोहोचला. शुक्रवारी मुसळधार पाऊस असल्यामुळे धबधब्याचा प्रवाह वेगवान आणि नदीची पाणी पातळी वाढली होती. अशा धोकादायक परिस्थितीत काही विद्यार्थी पाण्यात उतरले. राहुल बिंद याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात वाहून गेला. सहकाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याच्या वेगामुळे प्रयत्न निष्फळ ठरले.
घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशामक दल, वन खाते आणि वाळपई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सलग ४ तास शोधकार्य सुरू होते. अखेर दुपारी ४ च्या दरम्यान राहुलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शोधकार्यात एलएफएफ ए. एन. देसाई, आर. आर. कवठणकर, एस. एल. गावकर, ए. जी. नार्वेकर आणि आर. एस. सालेलकर यांनी सहभाग घेतला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी गोमेकॉत पाठवून दिला.
तोणीर-काजरेधाट मृत्यूचे सापळे
तोणीर-काजरेधाट धबधबा निसर्गरम्य तितकाच जीवघेणा आहे. उंच कड्यावरून कोसळणारे पाणी आणि खाली असलेले खोल डोह यामुळे येथे यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. नदीपात्रात मोठे खड्डे, पाण्याचे भोवरे आणि निसरडे खडक आहेत. पर्यटकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. प्रवाहात अडकल्यास बाहेर पडणे अशक्य होते. एका वर्षात सत्तरीतील विविध धबधबे आणि नद्यांमध्ये १० हून अधिक जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
शिक्षक, व्यवस्थापन, एजंटावर कारवाईची मागणी
वन खात्याची लेखी परवानगी नसताना बंदी असलेल्या धबधब्यावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणे बेजबाबदार आणि कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळा आणि शिक्षकांवर असते. धोका माहीत असतानाही विद्यार्थ्यांना अशा ठिकाणी नेल्याने एका कुटुंबाचा आधार गेला. संबंधित शिक्षक, प्राचार्य आणि विद्यालय व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.


