सत्तरीतील तोणीर धबधब्यावर १७ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

युद्धपातळीवर राबवलेल्या शोधमोहीमेनंतर मृतदेह सापडला

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
07th August, 02:41 pm
सत्तरीतील तोणीर धबधब्यावर १७ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून  मृत्यू

वाळपई : सत्तरी तालुक्यातील सावर्डे ग्रामपंचायत क्षेत्रातील तोणीर-काजरेधाट येथील धबधब्यावर ट्रेकिंगसाठी आलेला राहुल बिंद (वय १७, रा. बायणा, वास्को) हा इयत्ता ११वीचा विद्यार्थी पाण्यात बुडून  मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली.  वन खाते, वाळपई पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने युद्धपातळीवर राबवलेल्या शोधमोहीमेनंतर त्याचा मृतदेह सापडला. 

वन खात्याची नजर चुकवून धबधब्यावर प्रवेश

प्राप्त माहितीनुसार, सडा-वास्को येथील दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमारे ४० विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह ट्रेकिंगसाठी तोणीर-काजरेधाट परिसरात आले होते. पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी वन विभागाने या धबधबा परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी लागू केली आहे. असे असतानाही काही विद्यार्थ्यांनी वन कर्मचाऱ्यांची नजर चुकवून धबधब्याकडे धाव घेतली.

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दुर्घटना

धबधब्याजवळ पोहोचल्यानंतर राहुल बिंद हा पाण्यात उतरला. मात्र, पावसाळ्यामुळे पाण्याच्या खोलीचा आणि तीव्र प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात ओढला गेला आणि बेपत्ता झाला. सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा वेग जास्त असल्याने तो काही क्षणांतच नजरेआड झाला.

मुसळधार पावसामुळे शोधकार्यात अडथळे

घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, वन खात्याचे जवान आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. सध्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून धबधब्यातील पाण्याच्या पातळीत व प्रवाहात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे बचाव पथकांना शोधकार्यात मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. तरीही अत्यंत दक्षतेने आणि कौशल्याने शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.

सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन

पावसाळ्यात धबधबे, नद्या आणि ओढ्यांच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह अनपेक्षितपणे वाढतो. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार धोक्याचा इशारा देऊन प्रवेशबंदी लागू केली जाते. तरीही नियमांचे उल्लंघन करून अतिउत्साहात धोकादायक ठिकाणी जाणे जीवावर बेतू शकते, याची जाणीव या घटनेने पुन्हा एकदा करून दिली आहे. बेपत्ता राहुल बिंद याचा शोध सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

गोव्यात सहा महिन्यांत ७६ जणांचा बुडून मृत्यू; तरुणांचे सर्वाधिक बळी 

 गोव्यात २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत बुडून मृत्यू झालेल्यांची संख्या ७६ वर पोहोचली आहे.  त्यात जास्त करून तरुणांचा समावेश आहे. आणि ही बाब धक्कादायक आहे.

 राज्यातील विविध समुद्रकिनारे, नद्या आणि धबधबे येथे बुडून हे मृत्यू झाले आहेत. अनेक घटनांमध्ये प्रशासनाने दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष, निषिद्ध भागात पोहण्याचा प्रयत्न अंगलट आल्याचे दिसून आले आहे.  सेल्फी किंवा साहसी कृत्यांचा अट्टहास आणि पावसाळ्यातील वेगवान प्रवाह व प्रतिकूल हवामान ही जीवावर बेतण्यास कारणीभूत ठरल्याचे दिसून आले आहे. 

धबधबे, नद्यांमधील पाण्याचा प्रवाह ठरतोय धोकादायक

विशेषतः पावसाळ्यात धबधबे आणि नद्यांमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढत असल्याने अशा ठिकाणी जाणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. प्रशासनाने नागरिकांसह पर्यटकांना लाल ध्वज, चेतावणी फलक आणि लाईफगार्डच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

सुरक्ष‌िततेचे नियम पाळण्याचे आवाहन 

प्रशासनाने वारंवार इशारे देऊनही अनेक जण निषिद्ध भागात प्रवेश करत असल्याने अशा दुर्घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सुरक्षिततेचे नियम पाळूनच पर्यटनस्थळांना भेट द्यावी, असे आवाहन संबंधित यंत्रणांनी केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा