पणजी : भविष्यात राजधानी पणजीहून दूरच्या भागात जाण्यासाठी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची किंवा बसचे धक्के समस्या कायमची दूर होणार आहे. या वर एक विश्वासार्ह पर्याय म्हणून ‘वॉटर मेट्रो’ ही संकल्पना समोर आली आहे. मुख्य रस्ते वगळून आता जलमार्गाचा वापर करत १११ किमी लांबीच्या ९ जलमार्गांवर ३२ ठिकाणी वॉटर मेट्रो धावणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती देताना नदी वाहतूक संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी ९ जलमार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. या मार्गांवर ३२ टर्मिनल्स उभारली जातील आणि ८७ वॉटर मेट्रो बोटी या टर्मिनल्सना जोडतील. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ३,१४६ कोटी रु. खर्च अपेक्षित आहे.
वॉटर मेट्रोने जोडणारी ३२ ठिकाणे
पणजी, कुंभारजुवे, बेती, टोंक, बिठ्ठोण, सारमानस, रायबंदर, कुठ्ठाळी, चोडण, मडकई, सांपेद्र, रासय, दिवाडी, अाडपई, आंबई, दुर्भाट, वांशी, केरी, पिएदाद, तेरेखोल, जुने गोवे, वास्को, नार्वे, रेईश मागूश, सां माथियस, आग्वाद किल्ला, टॉल्टो, धावजी, बागा खाडी, शापोरा किल्ला, गवंडाळी आणि दोनापावला हे सर्व भाग वॉटर मेट्रोच्या जाळ्याशी जोडले जातील.
वॉटर मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर सुरुवातीला दररोज सरासरी ३९,७६५ ते ४३,२४० नागरिक प्रवास करतील असा अंदाज आहे. त्यानंतर २०३१ पर्यंत ही संख्या दररोज ४१,६६१ ते ४५,३१७ आणि २०४१ पर्यंत दररोज ५६,१६७ ते ६०,६३९ प्रवाशांपर्यंत पोहोचेल, अशी शक्यता खात्याने व्यक्त केली आहे.
बोट क्षमता आणि प्रवाशांचा तपशील
प्रवासी क्षमता एक एकूण बोटी
३०० प्रवासी १६ बोटी
१५० प्रवासी २६ बोटी
१०० प्रवासी १६ बोटी
५० प्रवासी २९ बोटी
वॉटर मेट्रोचे प्रस्तावित ९ जलमार्ग
जलमार्ग (टर्मिनल्स) अंतर (किमी) टप्पा
पणजी-बिठ्ठोण-चोडण-आंबई-वांशी-नार्वे १२.३ किमी पहिला
बेती-पणजी-रायबंदर-दिवाडी-सांपेद्र-जुने गोवा ९.८ किमी पहिला
जुने गोवा-पिएदाद-सां माथियस- नार्वे- सारमानस-टोंक १०.९ किमी पहिला
वास्को-कुठ्ठाळी ८.६ किमी दुसरा
कुठ्ठाळी-मडकई-रासई-अडपई-दुर्भाट १२.१ किमी पहिला
जुने गोवा-टोल्टो-धावजी-गवंडाळी-कुंभारजुवे ४.७ किमी पहिला
पणजी-दोनापावला-वास्को १४.८ किमी पहिला
पणजी-रेईश मागूश-आग्वाद-बागा-शापोरा २३.६ किमी पहिला
शापोरा - केरी - तेरेखोल १४.२ किमी भविष्यातील प्रस्ताव

