पणजी : मडगाव ते काणकोण महामार्गावर पाडी येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेल गळती झाल्याने रस्ता निसरडा बनला आहे. त्यामुळे याठिकाणी मडगावहून म्हैसूरला जात असलेल्या सीबर्ड व्होल्वो बसचा अपघात झाला. त्यात एकजण गंभीर तर चारजण किरकोळ जखमी झाले. जखमी झालेल्याला १०८ रुग्णवाहिकेने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काल संध्याकाळी उशीरा झालेल्या या अपघातानंतर बाळ्ळी ते काणकोण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रात्री उशीरा या रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी खोला मार्गे वळविण्यात आली. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. यासंदर्भात पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिल्यावर आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे.


