आंबेखण-पर्वरी अपघातातील बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला

दोन दुचाकींच्या धडकेनंतर ओढ्यात पडून झाला होता बेपत्ता

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
06th August, 09:49 am
आंबेखण-पर्वरी अपघातातील बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला

म्हापसा : आंबेखण-सुकूर, पर्वरी येथे दोन दुचाकींच्या धडकेनंतर ओढ्यात कोसळून बुडालेल्या आकाश बिश्वकर्मा (३०, रा. सुकूर व मूळ पश्चिम बंगाल)  याचा मृतदेह आज सकाळी सापडला.

 हा अपघात बुधवारी रात्री ८ वाजता घडला होता.  आकाश आणि फरहान अहमद (रा. सुकूर व मूळ उत्तरप्रदेश)  या दोघांच्या दुचाकींची गणेश विसर्जनस्थळाजवळ समोरासमोर टक्कर झाली होती. 

या भीषण अपघातानंतर रस्त्याशेजारील ओढ्यात आकाश हा दुचाकीसह कोसळला होता. घटनेची माहिती मिळताच पर्वरी अग्निशमन दलाने राबवलेल्या शोध मोहिमेत दुचाकी सापडली होती. परंतु आकाश हा सापडला नव्हता. त्यामुळे अग्निशमन दलाने रात्री शोधमोहीम थांबवली होती.

आज गुरुवारी सकाळी पर्वरी अग्निशमन दलाचे अधिकारी विनायक फडते व उपअधिकारी समीर नाईक यांच्या नेतृत्वाखालील दलाच्या जवानांनी शोध मोहीम पुन्हा राबवली. तेव्हा घटनास्थळी काही अंतरावर मृतदेह सापडला. 

पर्वरी पोलीस स्थानकाचे (Porvorim Police station)  निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण शिरोडकर व हवालदार विवेक दिवकर पुढील तपास करत आहेत.