गोव्यातील हरमल समुद्रकिनाऱ्यावर भेट; युरोप सोडून थाटला भारतात संसार!

अनोळखी व्यक्तीसोबतची मैत्री प्रेमात फुलली; आता पती, मुलासह भारतात सुखी आयुष्य

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
11 mins ago
गोव्यातील हरमल समुद्रकिनाऱ्यावर भेट; युरोप सोडून थाटला भारतात संसार!

पणजी : प्रेमकथा अनेकदा नियोजित भेटी, कुटुंबीयांची ओळख किंवा सोशल मीडियावरून सुरू होतात. मात्र स्लोव्हाकियातील तेरेझिया नोदकोवा (Terra Hu) हिची प्रेमकथा गोव्यातील हरमल समुद्रकिनाऱ्यावर एका अनोळखी व्यक्तीशी झालेल्या साध्या संवादातून सुरू झाली. संवादाचे रुपांतर कधी प्रेमात झाले, दोन मनाच्या तारा कधी जुळल्या आणि नंतर कधी विवाह बंधनात अडकली कळलेच नाही.  आणि आज ती आपला देश, जवळच्यांना सोडून भारतात पती व मुलासह आनंदाने संसार करत आहे. (A woman left Europe for a stranger she met on a Goa beach, leading to love and motherhood. This leap of faith changed her life forever.)

स्लोव्हाकियाची राजधानी ब्रातिस्लावा येथे जन्मलेल्या तेरेझियाने कला व डिझाइनचे शिक्षण घेतले होते. मॉडेल म्हणून काम करत असताना तिला प्रवास, योग आणि वैदिक ज्योतिष यांची विशेष आवड निर्माण झाली. भारताबद्दल तिला नेहमीच एक वेगळे आकर्षण वाटत होते आणि याच आकर्षणामुळे ती गोव्यात आली होती.

हरमल समुद्रकिनाऱ्यावर तिची ओडिशातील राकेश मोहंती यांच्याशी ओळख झाली. पहिल्याच भेटीत दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर जवळपास आठवडाभर दोघे दररोज एकत्र वेळ घालवत होते. या मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले आणि अखेर दोघांनी विवाह केला.

युरोपमधील आयुष्य मागे सोडून भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांकडून प्रश्न आणि आश्चर्य व्यक्त झाले. मात्र तेरेझियाच्या कुटुंबाने तिच्या निर्णयाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला. तिच्या मते, "माझ्या कुटुंबाने कधीच त्याच्या राष्ट्रीयत्वाकडे पाहिले नाही. मी आनंदी आहे आणि तो चांगला माणूस आहे, एवढेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते."

विवाहानंतर तेरेझिया भारतातच स्थायिक झाली. राकेश आपल्या कुटुंबाच्या बांधकाम आणि बांधकाम साहित्य व्यवसायाची जबाबदारी सांभाळत आहे. आज हे दाम्पत्य आपल्या मुलासह भारतात आनंदी आयुष्य जगत आहे.

भारताबद्दल बोलताना तेरेझिया सांगते की, "युरोपच्या तुलनेत भारतात मला अधिक शांतता आणि वर्तमानात जगण्याची भावना अनुभवायला मिळते. प्रत्येक दिवस मला काहीतरी नवीन शिकवतो आणि प्रत्येक अनुभवाने मला अधिक समृद्ध केले आहे."

गोव्यातील हरमल समुद्रकिनाऱ्यावर सुरू झालेली ही अनपेक्षित भेट आज प्रेम, विश्वास आणि नव्या आयुष्याचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

हेही वाचा
सर्व पहा