नवी दिल्ली : अन्न व पेय क्षेत्रातील उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत कठोर भूमिका घेत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) दारूच्या काही प्रसिद्ध ब्रँड्सच्या विक्रीवर तात्काळ बंदी घातली आहे. मद्यनिर्मितीच्या नियमांचे उल्लंघन करून उत्पादनांमध्ये कृत्रिम फ्लेवरचा गैरवापर केल्याचे प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये उघड झाल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
'एफएसएसएआय'ने दिलेल्या माहितीनुसार, डियाजिओ इंडियाची 'युनायटेड स्पिरिट्स', 'इनब्रू बेवरेजेस' आणि 'मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर' या कंपन्यांद्वारे उत्पादित केल्या जाणाऱ्या विशिष्ट व्हिस्की आणि रमच्या प्रकारांवर ही बंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये युनायटेड स्पिरिट्सच्या 'अँटिक्विटी ब्लू व्हिस्की' आणि 'रॉयल चॅलेंज व्हिस्की' तसेच 'मॅकडोवेल्स'च्या काही प्रकारांचा समावेश आहे. याशिवाय 'इनब्रू'च्या 'बॅगपायपर डिलक्स व्हिस्की' आणि 'ओल्ड कास्ट डिलक्स ट्रिपल एक्स रम'च्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. मद्यप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या 'ओल्ड मंक'च्या 'द लेजंड', 'गोल्ड रिझर्व्ह' आणि 'ट्रिपल एक्स मॅच्युअर्ड रम' या व्हॅरिएंट्सवरही ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रयोगशाळेतील चाचण्यांदरम्यान असे निष्पन्न झाले की, मद्याला नैसर्गिक स्वाद व सुगंध देण्यासाठी आवश्यक मॅच्युरेशन प्रक्रिया किंवा माल्ट व द्राक्षे यांसारख्या मूळ घटकांचा वापर न करता कंपन्या बाहेरील कृत्रिम फ्लेवर्सचा वापर करत होत्या. रम किंवा व्हिस्कीमध्ये कृत्रिम फ्लेवर मिसळणे ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पद्धत नाही, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले. अशा प्रकारे कृत्रिम फ्लेवर्स वापरून ग्राहकांची दिशाभूल करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा भंग आहे.
गेल्या काही दिवसांत एफएसएसएआयने मानकांबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. यापूर्वी डाबरच्या मध, ॲपल सायडर व्हिनेगर, तूप आणि नारळ पाण्यावर '१००% शुद्ध' असे चुकीचे दावे केल्याप्रकरणी कारवाई झाली होती. तसेच 'पेप्सी' आणि 'रेड बुल'सारख्या पेयांना 'एनर्जी ड्रिंक' म्हणून विकण्यास मनाई करण्यात आली आहे.


