करासवाडा महामार्गावर एका पादचाऱ्यामुळे ४ वाहनांचा साखळी अपघात; वाहनांचे मोठे नुकसान

गोव्यातील करासवाडा येथे एका पादचाऱ्यामुळे ४ वाहनांचा साखळी अपघात झाला. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
27 mins ago
करासवाडा महामार्गावर एका पादचाऱ्यामुळे ४ वाहनांचा साखळी अपघात; वाहनांचे मोठे नुकसान

पणजी : राष्ट्रीय महामार्गावरील करासवाडा जंक्शन जवळ आज एका पादचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे चार वाहनांचा विचित्र, साखळी अपघाताची घटना घडली. अचानक रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणारी वाहने एकामागोमाग एक एकमेकांवर आदळली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करासवाडा महामार्गावर वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू असताना एक पादचारी अचानक रस्ता ओलांडण्यासाठी पुढे आला. त्याला वाचवण्यासाठी पुढे असलेल्या चालकाने क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ ब्रेक दाबले. मात्र, मागून वेगात येणाऱ्या कदंबा बस,  कार आणि पिकअप वाहनांना सावरणे शक्य झाले नाही. त्यामुळे ही वाहने अत्यंत वेगाने एकमेकांवर जाऊन धडकली. या धडकेचा आवाज एवढा मोठा होता की परिसरातील नागरिक आणि इतर वाहनचालक मदतीसाठी घटनास्थळी धावले.

या अपघातामध्ये कारचे पुढील आणि मागील दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले असून वाहनांचे एअरबॅग्स उघडल्याचे दिसून आले. तसेच पिकअप वाहन आणि कदंबा बसच्या पुढील भागाचाही चक्काचूर झाला आहे. अपघात घडताच महामार्गावर काही काळासाठी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.



हेही वाचा
सर्व पहा