गोव्यात ‘व्हिसा-ऑन-अरायव्हल’, ‘ओपन स्काय’ धोरण लागू करा!

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याशी चर्चा

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
41 mins ago
गोव्यात ‘व्हिसा-ऑन-अरायव्हल’, ‘ओपन स्काय’ धोरण लागू करा!

पणजी : पर्यटकांचा गोवा प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर व्हावा यासाठी देशातील इतर ६ मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांप्रमाणेच गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा आणि गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ दाबोळी येथे ‘व्हिसा-ऑन-अरायव्हल’ सुविधा तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी केली. तसेच ‘ओपन स्काय’ धोरणांतर्गत आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना गोव्यात थेट उड्डाणे सुरू करण्याची परवानगी द्यावी, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला मोठा वाव मिळेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
गोव्याला वर्षाचे बाराही महिने पर्यटकांना आकर्षित करणारे उच्च दर्जाचे पर्यटन केंद्र बनवण्यासाठी आणि विमान वाहतूक वाढवण्यासाठी मंत्री खंवटे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली. या बैठकीत गोव्यातील पर्यटन वाढीसंदर्भात विविध महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.
मध्य आशिया आणि सीआयएस देशांमधून थेट पर्यटकांना गोव्यात आणण्यासाठी गोव्याला ‘पॉइंट ऑफ कॉल’ म्हणून मान्यता देण्याची विनंती खंवटे यांनी केली. याशिवाय देशातील मुख्य शहरांमधून गोव्यात येणाऱ्या देशांतर्गत विमानांची संख्या वाढवण्याबाबतही उभय मंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
गोव्याच्या बदलत्या पर्यटन मॉडेलवर भर
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, गोवा आता केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आता आरोग्य पर्यटन, वारसा, संस्कृती, साहसी खेळ, परिषदा आणि प्रदर्शन तसेच पुनरुत्पादक पर्यटनाचे मुख्य केंद्र म्हणून गोवा पुढे येत आहे. गोवा जेव्हा उच्च-मूल्याच्या आणि १२ महिने चालणाऱ्या शाश्वत पर्यटन मॉडेलकडे वाटचाल करत आहे, तेव्हा देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक वाढवणे आणि पर्यटकांचा प्रवास सोपा करणे अत्यंत गरजेचे आहे. केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा
सर्व पहा