नशामुक्तीसाठी क्रीडा हे प्रभावी माध्यम : मुख्यमंत्री

जेन-झी व जेन-अल्फा पिढीसाठी क्रीडा क्षेत्र महत्वाचे म्हापशात अप्लाईड स्पोर्ट्स सायन्स कार्यशाळेचे आयोजन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
35 mins ago
नशामुक्तीसाठी क्रीडा हे प्रभावी माध्यम : मुख्यमंत्री

म्हापसा :  राज्य सरकारने तालुकास्तरावर आवश्यक क्रीडा पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत. नशामुक्त अभियानाअंतर्गत युवा वर्गाला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी क्रीडा हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. खेळांशी जोडल्याने तरुण स्वतःचे आरोग्य आणि करिअरवर लक्ष केंद्रीत करू शकतील. नशामुक्त युवाच भविष्यात विकसित गोवा आणि विकसित भारतचे नेतृत्व करतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.


पेडे, म्हापसा येथील स्व. भाऊसाहेब बांदोडकर क्रीडा संकुलात राज्य सरकारच्या क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय आणि गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अप्लाईड स्पोर्ट्स सायन्स’ (प्रयुक्त क्रीडा विज्ञान) या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

३ ते ५ ऑगस्टदरम्यान या तीन दिवसीय ‘क्षमता वाढ’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी क्रीडा मंत्री रमेश तवडकर व क्रीडा संचालक अजय गावडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुढे बोलताना जेन-झी आणि जेन-अल्फा पिढीचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी क्रीडा क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक आणि प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विविध क्रीडा प्रकारात पारंगत करणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सातत्याने ज्ञान समृद्ध केले पाहिजे.

२० टक्के प्रशिक्षकांची अपेक्षित कामगिरी; गोव्यासाठी चिंताजनक : मंत्री तवडकर 

क्रीडामंत्री रमेश तवडकर म्हणाले की, ‘फिट इंडिया’ हे स्वप्न साकार करण्यासाठी शाळांमधील शिक्षक आणि क्रीडा प्रशिक्षकांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. सध्याच्या क्रीडा प्रशिक्षकांच्या कामगिरीवर त्यांनी असमाधान व्यक्त केले. सध्या केवळ २० टक्के प्रशिक्षकच अपेक्षित कामगिरी करत आहेत, ही बाब गोव्यासाठी अत्यंत चिंताजनक आहे.

क्रीडा क्षेत्रात गुणवत्ता वाढवणे आणि देशाला निरोगी व तंदुरुस्त बनवण्यासाठी प्रशिक्षकांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षक आणि प्रशिक्षकाने आपल्या कामाचे सातत्याने आणि प्रामाणिकपणे स्वयंमूल्यांकन करावे, जेणेकरून या क्षेत्रातील ही स्थिती सुधारून ‘फिट इंडिया’ अभियानाला खरी गती मिळू शकेल, असा सल्ला त्यांनी दिला.

 या कार्यशाळेचा मुख्य उद्देश वैज्ञानिक ज्ञान आणि प्रत्यक्ष क्रीडा प्रशिक्षण यातील अंतर कमी करून खेळाडूंची कामगिरी, सुरक्षा व मानसिक आरोग्य सुधारणे हा आहे.  यासाठी देशभरातील दिग्गज तज्ज्ञ डॉ. मोयांगर पी. आओ (क्रीडा वैद्यक व दुखापत निवारण), प्रा. संदीप तिवारी (क्रीडा प्रशिक्षण), प्रा. उषा सुजित नायर (शरीर क्रीयाशास्त्र), डॉ. केरन हरिश तिवारी (खेळाडूंचे पोषण), डॉ. कुलदीप सिंग (क्रीडा मानसशास्त्र),  डॉ. विश्वनाथ सुंदर (बायोमेकॅनिक्स) आणि प्रा. रीना चेरुवलथ (क्रीडा क्षेत्रातील नैतिकता) यांचा समावेश आहे.

व्याख्याने, प्रात्यक्षिके आणि व्हिडिओ विश्लेषणाच्या माध्यमातून क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षक आणि निवडक शारीरिक शिक्षण शिक्षकांना या कार्यशाळेत क्रीडा विज्ञानाचे प्रत्यक्ष धडे दिले जाणार आहेत.

हेही वाचा
सर्व पहा