पणजी : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तसेच तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून धमकावल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी कर्नाटकातील बेल्लारी येथून रवी तेजा या २५ वर्षीय संशयिताला अटक केली आहे.
पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत संशयिताने तिच्याशी मैत्री करून लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी अनेकदा लैंगिक संबंध ठेवले. तसेच, तिला नशायुक्त पेय देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यानंतर संशयिताने लग्नास नकार दिला. तसेच पीडितेचे खासगी फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्यास सुरुवात करून तिला धमकावल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीच्या आधारे पर्वरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांचे विशेष पथक हैदराबाद आणि कर्नाटकातील बेल्लारी येथे रवाना झाले. पथकाने २ ऑगस्ट २०२६ रोजी बेल्लारी येथून संशयिताला ताब्यात घेत अटक केली.
अटक करण्यात आलेल्या संशयिताचे ओळख रवी तेजा (वय २५, रा. मोका, बेल्लारी, कर्नाटक) अशी आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ६९, १२३ आणि ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पीएसआय विराज सावंत, पोलिस शिपाई आकाश नावेलकर आणि संगम मातोणकर यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पर्वरी पोलीस स्थानकाचे (Porvorim Police station) निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एसडीपीओ विश्वेश कार्पे यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.


