तंत्रज्ञानाच्या जाळ्यात अडकले शेतकरी; ॲप प्रणाली रद्द करण्याची मागणी

मोरजीत गोदाम नसल्याने खतांसाठी भटकंती करावी लागणाऱ्या शेतकऱ्यांना आता ॲप आणि ओटीपी प्रक्रियेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. ॲपऐवजी कृषी कार्डवर खते देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
6 hours ago
तंत्रज्ञानाच्या जाळ्यात अडकले शेतकरी; ॲप प्रणाली रद्द करण्याची मागणी

मोरजी: मोरजी येथील स्थानिक शेतकऱ्यांना सध्या शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतांची खरेदी करताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गावात खतांचे हक्काचे गोदाम उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना मांद्रे, पेडणे येथील सोसायट्यांमध्ये किंवा पेडणे बागायतदार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. तिथेही साठा उपलब्ध नसल्यास शेतकऱ्यांना थेट लगतच्या महाराष्ट्रातील बांदा किंवा आरोंदा बाजारपेठेकडे धाव घ्यावी लागते. या त्रासात भर म्हणून आता शासनाने खत खरेदीसाठी 'ॲप' आधारित नवी डिजिटल प्रणाली सक्तीची केल्याने शेतकरी वर्ग अधिकच अडचणीत सापडला आहे.

शासनाच्या नव्या नियमानुसार प्रथम मोबाईलवरून क्यूआर कोड स्कॅन करून संबंधित एफएफएस (FFS) ॲप डाऊनलोड करावे लागते. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) सोसायटीला दिल्यानंतरच खत उपलब्ध असल्यास मिळते, अन्यथा पुढील साठ्याची वाट पाहावी लागते. मोरजीतील अनेक शेतकरी अल्पशिक्षित असल्याने त्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा ॲप वापरण्याचे ज्ञान नाही. महाराष्ट्रात अशी कोणतीही ॲप प्रणाली नसल्याने शेतकरी विनासायास तिथे जाऊन खते खरेदी करत आहेत. या पार्श्वभूमीवर, डिजिटल ॲपची ही किचकट आणि वेळखाऊ अट तात्काळ रद्द करून केवळ 'कृषी कार्ड'च्या आधारे थेट खत पुरवठा करावा, अशी आग्रही मागणी मोरजीतील शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, राजकीय नेत्यांकडून किंवा स्थानिक आमदारांकडून जेव्हा मोफत खत वाटप केले जाते, तेव्हा ही ॲप प्रणाली किंवा कसलीही अट का लादली जात नाही? असा सवालही त्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांची ही व्यावहारिक अडचण विचारात घेऊन खत वाटपाची पद्धत सुलभ करावी आणि मोरजीत लवकरात लवकर गोदाम सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

हेही वाचा
सर्व पहा