मिशन २०२७: आगामी विधानसभा निवडणुकीत ३० जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार

भाजप हा संघटनात्मक पक्ष असून, २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत ३० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पक्षाने निश्चित केले आहे. सत्ता नसल्याने विरोधक केवळ खोटा नॅरेटिव्ह आणि संभ्रम पसरवत आहेत, असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
51 mins ago
मिशन २०२७: आगामी विधानसभा निवडणुकीत ३० जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार

पणजी : भारतीय जनता पक्ष हा संघटनात्मक बांधणीवर चालणारा पक्ष असून, याच मजबूत संघटनेच्या बळावर देशात २ वरून ३०३ खासदारांपर्यंत मजल मारण्यात पक्षाला मोठे यश आले आहे. आता गोव्यातही संघटना आणि कार्यकर्त्यांमधील योग्य समन्वयाच्या बळावर 'मिशन २०२७' अंतर्गत आगामी विधानसभा निवडणुकीत ३० जागा जिंकण्याचा संकल्प निश्चितच पूर्ण केला जाईल, असा ठाम विश्वास भाजपचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केला आहे. पक्षसंघटना आणि कार्यकर्त्यांची फळी राज्यात भक्कमपणे काम करत असून, आगामी निवडणुकीत याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील असे त्यांनी स्पष्ट केले. सांगे भाजप मंडळ मोर्चा अध्यक्षांची घोषणा करण्यात आली.  सिद्धार्थ नाईक, विजेंद्र वेळीप, नवनाथ नाईक आणि रमाकांत नाईक यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

पक्षाचे विविध प्रकोष्ट, मोर्चे, समित्या आणि कार्यकर्ते सर्व मतदारसंघांमध्ये अत्यंत प्रभावीपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. नेते केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष मतदारसंघांमध्ये जाऊन, प्रवास करून आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी समन्वय साधून कामाचा आढावा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली विकासकामे, 'आत्मनिर्भर भारत' आणि 'स्वयंपूर्ण गोवा' सारख्या यशस्वी योजनांचा प्रसार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. किसान मोर्चा, महिला मोर्चा आणि वैद्यकीय सेलसारख्या विविध आघाड्या आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत असून, अर्थसंकल्पातील योजना सामान्य माणसापर्यंत नेण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. 

गोव्यातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील प्रगतीवर भाष्य करताना ते म्हणाले की, राज्यात पूर्वी वैद्यकीय शिक्षणाच्या (Medical) जागा केवळ ५० होत्या, त्या आता २५० पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे गोव्यातील तब्बल २०० अतिरिक्त विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. याशिवाय विविध कॉर्पोरेट शिष्यवृत्ती आणि 'स्कील इंडिया' सारख्या माध्यमातून युवकांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात असून, युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

यावेळी विरोधकांवर सडकून टीका करताना नाईक म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेच्या बाहेर राहावे लागल्याने विरोधकांची मोठी तडफड सुरू आहे. त्यांच्याकडे कोणतेही ठोस मुद्दे नसल्याने ते केवळ जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करून खोटा नॅरेटिव्ह (False Narrative) सेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मात्र, गोव्यातील जनता अतिशय सुबुद्ध आणि समजूतदार आहे. केंद्रात आणि राज्यात कोणाचे सरकार आहे आणि विकासकामे नेमकी कोण करत आहे, याची जनतेला पूर्ण जाण आहे. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना आणि संभ्रमाला जनता अजिबात बळी पडणार नाही, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा
सर्व पहा