साखळी: गेली अनेक वर्षे ग्रामीण भागात निस्वार्थ भावनेने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना आज सरकारदरबारी योग्य ओळख मिळत आहे. आपल्या कार्यकाळात ही बाब घडत असल्याचा मुख्यमंत्री या नात्याने सार्थ अभिमान व समाधान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ग्रामीण भागातील पत्रकारांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सरकार गंभीर असून लवकरच ५० वर्षांवरील पत्रकारांसाठी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे. यासोबतच पत्रकारांना ५० टक्के सवलतीवर ई-वाहने, कॅमेरा, लॅपटॉप आणि मोबाईल खरेदीची योजनाही लवकरच अंमलात आणली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली.
साखळी येथील रवींद्र भवनात, साखळी रवींद्र भवन व अखिल गोवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त आयोजित ‘पत्रकार कुटुंब कृतज्ञता सोहळा’ प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमात राज्यभरातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
विकसित भारत आणि विकसित गोवा साकारण्यासाठी पत्रकारितेचे योगदान अत्यंत मोलाचे आहे, असे नमूद करत पत्रकारांनी कोणत्याही राजकीय किंवा वैयक्तिक दबावाला बळी न पडता सत्य आणि समाजहिताची बाजू निर्भीडपणे मांडली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
यावेळी व्यासपीठावर पद्मिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत, माहिती व प्रसिध्दी खात्याचे संचालक अभिर हेदे, साखळी रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, रवींद्र भवनचे सदस्य सचिव ईश्वर मडकईकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत, रवींद्र भवनचे संचालक तथा कार्यक्रम समन्वयक रविराज च्यारी आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मुंबईतील महिला पत्रकार नम्रता वागळे यांची पत्रकार विश्वनाथ नेने यांनी प्रकट मुलाखत घेतली. तत्पूर्वी, औपचारिक कार्यक्रमाचे स्वागत दत्ताराम चिमुलकर यांनी केले, तर प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत यांनी मांडले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुटसुटीत सूत्रसंचालन अर्चना कांबळी यांनी केले आणि शेवटी बी. डी. मोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
‘बरेच’ नाही, तर ‘खरे’ ते लिहा!
समाजात विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले, आज समाजात विविध विषयांवरून चुकीची माहिती पसरवण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी माहितीची विश्वासार्हता तपासण्यासाठी नागरिक पत्रकारांच्या बातम्यांवरच विश्वास ठेवतात. त्यामुळे पत्रकारांनी केवळ ‘बरेच’ न लिहिता जे ‘खरे’ आहे तेच लिहिले पाहिजे. पत्रकार हा केवळ बातम्या देणारा नसून समाजाला दिशा देणारा, जनमत घडवणारा आणि शासन व जनतेमधील विश्वासाचा मुख्य दुवा आहे, असे ते म्हणाले.


