म्हापसा, पणजी, मुरगाव, दाबोळीत ४० इंचांपेक्षा कमी पाऊस

राज्यात आतापर्यंत सरासरी ५२.४४ इंच पावसाची नोंद


02nd August, 11:57 pm
म्हापसा, पणजी, मुरगाव, दाबोळीत ४० इंचांपेक्षा कमी पाऊस

पणजी बसस्थानकासमोर तुंबलेले पावसाचे पाणी. (नारायण पिसुर्लेकर)
गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : राज्यात आतापर्यंत पावसाने सरासरी ५० इंचांचा टप्पा ओलांडला असला तरी म्हापसा, पणजी, मुरगाव आणि दाबोळी या चार ठिकाणी ४० इंचांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. पणजीत आतापर्यंत फक्त ३४ इंच पाऊस झाला आहे. धारबांदोडा येथे सर्वाधिक ७१ इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे, केपे आणि धारबांदोडा येथे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत सरासरी १३.७ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत धारबांदोडा येथे सर्वाधिक ७२.४ मिमी पाऊस झाला. आतापर्यंत राज्यात १३३२.१ मिमी म्हणजेच ५२.४४ इंच पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी आहे. गेल्यावर्षी ३ ऑगस्टपर्यंत ८० इंच पाऊस झाला होता. यंदा राज्यातील सर्वच भागांत पावसाचे प्रमाण कमी असून पणजीत त्याची तूट अधिक आहे. आतापर्यंत म्हापसा येथे ३८.५४ इंच, पणजीत ३४ इंच, मुरगावात ३८ इंच, तर दाबोळीत ३८ इंच पाऊस झाला आहे. धारबांदोडा येथे ७१ इंच, सांगे येथे ७० इंच आणि केपे येथे ६५ इंच पावसाची नोंद झाली आहे.
सतत दमट हवामान असून पावसाच्या सरी पडत आहेत. मात्र, त्या फार काळ टिकत नाहीत. काही वेळ पाऊस पडतो आणि त्यानंतर विश्रांती घेतो. पावसात सातत्य नसल्याने एकूण पर्जन्यमान कमी राहिले आहे. समाधानाची बाब म्हणजे दररोज पावसाची एखादी-दुसरी सर पडत आहे. पाऊस फार काळ टिकत नसल्याने तापमान मात्र अधिकच आहे. यंदा उत्तर गोव्याच्या तुलनेत दक्षिण गोव्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. उत्तर गोव्यात वाळपई आणि साखळी वगळता अन्य भागांत पावसाचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
विविध ठिकाणी नोंद झालेला पाऊस (मिमी मध्ये)
ठिकाण     २४ तासांत     आतापर्यंत
म्हापसा      ४.०              ९७९.९
पेडणे         ३.२             ११४२.४
पणजी        ३.२             ८५५.०
जुने गोवे     १०.३            १११७.४
साखळी      ११.८            १३६७.६
फोंडा         ४५.८           १४९४.०
धारबांदोडा  ७२.४           १८०३.६
काणकोण     ४.४            १६१०.२
दाबोळी        ३.०             ९६६.३
मडगाव        ७.१             १३६७.७
मुरगाव         २.४             ९६४.०
केपे            १५.०             १६४५.५
सांगे            १०.५             १७६१.६

हेही वाचा
सर्व पहा