वीज खात्यातील निलंबितांची विशेष अधिकारी करणार चौकशी

लाईनमनच्या मृत्यूसह विविध अपघातांप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या अभियंते व लाईनमन यांची विशेष अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण करून सहा महिन्यांत सरकारकडे अहवाल सादर केला जाणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास संबंधितांवर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.


7 hours ago
वीज खात्यातील निलंबितांची विशेष अधिकारी करणार चौकशी

गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : लाईनमनच्या मृत्यूसह विविध अपघातांप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या अभियंते व लाईनमन यांची विशेष अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण करून सहा महिन्यांत सरकारकडे अहवाल सादर केला जाणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास संबंधितांवर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारमधील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
गेल्या काही दिवसांत राज्यात लाईनमनच्या मृत्यूच्या घटनांसह विजेचा शॉक लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सरकारने या प्रकारांची गंभीर दखल घेऊन चौकशी केली. प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याने ६ अभियंते आणि ७ लाईनमन, अशा एकूण १३ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यातील ६ अभियंत्यांपैकी ३ साहाय्यक अभियंते राजपत्रित अधिकारी असल्याने त्यांच्या निलंबनाचे आदेश दक्षता संचालनालयाने जारी केले. कनिष्ठ अभियंते आणि लाईनमन यांच्या निलंबनाचे आदेश खात्याने जारी केले. अभियंते आणि लाईनमनवर चार वेगवेगळ्या अपघातांप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक अपघाताची आता विशेष अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली जाणार आहे. निलंबित अभियंते व लाईनमनांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर संबंधित घटनांची चौकशी केली जाणार आहे.
कनिष्ठ अभियंते आणि लाईनमनची चौकशी खात्याच्या अधिकाऱ्यामार्फत केली जाणार आहे. साहाय्यक अभियंते राजपत्रित अधिकारी असल्याने त्यांची स्वतंत्रपणे सरकारकडून चौकशी केली जाणार आहे. राजपत्रित अधिकाऱ्यांच्या चौकशी आणि कारवाईची प्रक्रिया वेगळी असते. दरम्यान, या कारवाईमुळे वीज खात्यातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. खात्यातील काही अधिकारी आणि कर्मचारी कामाकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्यासाठी ही कारवाई एक प्रकारचा इशारा असल्याचे बोलले जात आहे.
डिचोलीतील अपघातप्रकरणी लाईनमन निलंबित
डिचोली विभागातील अक्षत नाईक यांच्या अपघातप्रकरणी लाईनमन केदार मांद्रेकर यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नाही, असा आरोप त्यांच्यावर आहे. डिचोली विभागातील लाईन हेल्पर मंथन आरोसकर यांच्याशी संबंधित अपघातप्रकरणी साहाय्यक अभियंते समीर चोडणकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय कनिष्ठ अभियंते साईश सातार्डेकर यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच सुदेश गाड, प्रदीप गड्डी आणि प्रमोद कलकेकर या लाईन स्टाफलाही निलंबित करण्यात आले आहे. या अपघाताची विशेष अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली जाणार आहे.
शेळपेतील अपघाताची सखोल चौकशी
शनिवारी सांगेतील शेळपे येथे विजेचा खांब उभा करताना एका कामगाराचा मृत्यू झाला होता. अन्य चार कामगार जखमी झाले होते. वीजवाहिनी बंद न करताच काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कार्यकारी अभियंते उदय कुडाळकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. साहाय्यक अभियंते इमलेश गावकर आणि कनिष्ठ अभियंते अक्षय रेकडो यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच श्रीकांत पुजारी, रितुल नाईक आणि घनश्याम परवार यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
वेर्णा अपघातप्रकरणी अभियंते निलंबित
वेर्णा येथे शनिवारी रात्री खांबावरून विजेची वायर टेम्पोवर पडली. विजेचा शॉक लागून क्लिनरचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी वेर्णाचे कार्यकारी अभियंते गंगू कुट्टीकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. साहाय्यक अभियंते विक्रम कारेकर आणि सूरज पालेकर, तसेच कनिष्ठ अभियंते राज सत्यवान मांजरेकर यांना निलंबित करण्यात आले आहे. वीज खांबावरील तारांची पाहणी करून त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी अभियंत्यांची असते. देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने खांबावरील वायर तुटून खाली पडली. रस्त्यालगतचे खांब तसेच वीजवाहिन्यांची नियमित देखभाल करणे आवश्यक असते.

हेही वाचा
सर्व पहा