पणजी :गोव्यातील मांडवी, झुवारी आणि कुंभारजुवा या राष्ट्रीय जलमार्गांवरील प्रवासी वाहतुकीत अवघ्या एका वर्षात तब्बल तिप्पट वाढ झाली आहे. २०२४-२५ मधील ३४.३३ लाख प्रवाशांच्या तुलनेत २०२५-२६ मध्ये हा आकडा १.१७ कोटींहून अधिक झाला असून, ही माहिती केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.
मांडवी नदीमार्गावर सर्वाधिक प्रवासी
२०१६ मध्ये मांडवी, झुवारी आणि कुंभारजुवा या नद्यांना राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर फेरीबोट सेवेद्वारे प्रवासी वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षांत मांडवी नदीमार्गावर सर्वाधिक १,१५,१२,९४३ प्रवाशांनी प्रवास केला, तर झुवारी नदीमार्गावर २९,३१,९१० आणि कुंभारजुवा नदीमार्गावर ७,२०,७२४ प्रवाशांची नोंद झाली आहे.
२०२४-२५ मध्ये मांडवी नदीमार्गावर २८,०४,८२८ प्रवाशांनी प्रवास केला होता. २०२५-२६ मध्ये हा आकडा ८७,०८,११५ वर पोहोचला. झुवारी नदीमार्गावरही प्रवासी संख्या ६,२९,०३२ वरून २३,०२,८७८ इतकी वाढली. कुंभारजुवा नदीमार्गासाठी २०२४-२५ ची आकडेवारी उपलब्ध नसली तरी २०२५-२६ मध्ये या मार्गावर ७,२०,७२४ प्रवाशांनी प्रवास केला.
मांडवी, झुवारी आणि कुंभारजुवा या राष्ट्रीय जलमार्गांद्वारे एकूण २२.२५ मेट्रिक टन मालाची वाहतूक करण्यात आली. त्यापैकी मांडवी नदीमार्गावर सर्वाधिक १५.५५ मेट्रिक टन, झुवारी नदीमार्गावर ६.३४ मेट्रिक टन आणि कुंभारजुवा नदीमार्गावर ०.३६ मेट्रिक टन मालाची वाहतूक झाली.
रो-रो फेरी सेवेमुळे वाहनांसह फेरीबोटीत प्रवेश अधिक सुलभ झाला आहे. त्यामुळे महिला वाहनचालकांच्या संख्येत सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली असून, दोडामार्गसारख्या दुर्गम भागातील नागरिकही मोठ्या प्रमाणावर या सेवेचा लाभ घेत आहेत, अशी माहिती नदी वाहतूक खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी दिली.


