योग दिनाच्या खर्चावरून काँग्रेस-क्रीडा संचालक आमनेसामने

क्रीडा संचालकांना घेराव : संपूर्ण खर्चाचा तपशील जाहीर करण्याची मागणी


22 mins ago
योग दिनाच्या खर्चावरून काँग्रेस-क्रीडा संचालक आमनेसामने

क्रीडा संचालक अजय गावडे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करताना युवा काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक. सोबत अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी, अॅड. प्रतिमा कुतिन्हो व इतर. (नारायण पिसुर्लेकर)
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खर्चावरून गोवा प्रदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयात आंदोलन करूत क्रीडा संचालक अजय गावडे यांना घेराव घातला. योग दिनाच्या आयोजनासाठी झालेल्या संपूर्ण खर्चाचा तपशील जाहीर करा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. योग दिनाच्या बिलांची पडताळणी केल्याशिवाय संबंधित एजन्सीला कोणतेही पेमेंट केले जाणार नाही, असे आश्वासन क्रीडा संचालक डॉ. अजय गावडे यांनी आंदोलकांना दिले.
युवा काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी, अॅड. प्रतिमा कुतिन्हो व इतर सहभागी झाले होते. अर्चित नाईक म्हणाले, बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सरकारने किती खर्च केला, याबाबत माहिती अधिकाराखाली अर्ज करण्यात आला होता. मात्र, त्याला उत्तर देताना क्रीडा खात्याने तपशील दिलेला नाही. योग दिनाच्या आयोजनासाठी भोजन, योगा चटया, टी-शर्ट तसेच इतर साहित्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. १५ रुपयांचा बटाटेवडा ५० रुपयांना खरेदी केल्याचा आरोपही झाला आहे.
या अांदोलनावेळी वातावरण चांगलेच तापले होते. संचालक आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. कोणतीही निविदा न काढता आपल्या मर्जीतील एजन्सीला कंत्राट देण्यात आले असून, खर्चाचा तपशीलही दिला जात नसल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. संबंधित एजन्सीने आपला हिशोब सादर करेपर्यंत पैसे दिले जाऊ नयेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. योग दिनाच्या नावाखाली करदात्यांच्या पैशांची लूट झाल्याचा आरोप गोवा युवा काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक यांनी केला.
यंदा योग दिनाला १२ वर्षे पूर्ण झाली. मागील वर्षी योग दिनाच्या आयोजनासाठी सरकारने निविदा काढली होती. मात्र, यंदा निविदा न काढताच थेट एका एजन्सीची निवड करण्यात आली. आरटीआयच्या उत्तरानुसार, मंत्र्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या पसंतीच्या आणि भागीदारी असलेल्या एजन्सीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप नाईक यांनी केला. या प्रकरणात हस्तक्षेप करून पैसे अदा करण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी केल्याचे नाईक यांनी सांगितले.
पारदर्शकता ठेवून खर्चाचा तपशील जाहीर करा : पणजीकर
योग दिनाच्या कार्यक्रमासाठी किती बिले आली आहेत, याची माहिती आम्ही मागितली आहे. जोपर्यंत या बिलांची योग्य पडताळणी होत नाही, तोपर्यंत ती मंजूर करू नयेत, अशी मागणी केली आहे. ही बिले मंजूर झाल्यास हा मोठा आर्थिक गैरव्यवहार ठरेल. आरटीआयअंतर्गत संपूर्ण माहिती देऊन हिशोब स्पष्ट करावा, अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली.
पडताळणीनंतरच बिलांना मंजुरी : क्रीडा संचालक
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या सर्व बाबी ऐकून घेतल्या आहेत. कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून सरकारमान्य मान्यताप्राप्त एजन्सीला काम देण्यात आले आहे. अद्याप एजन्सीने बिले सादर केलेली नाहीत. बिले प्राप्त झाल्यानंतर आमची समिती त्यांची पडताळणी करेल. त्यानंतर वित्त खात्याकडूनही बिलांची तपासणी केली जाईल. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतरच बिलांचे पैसे अदा केले जातील, असे क्रीडा संचालक डॉ. अजय गावडे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा