धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस; २४ तासांत २.२९ इंच पाऊस
प्रतिनिधी गोवन वार्ता
पणजी : मागील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. दोन दिवसांत धरणातील पाणीसाठ्यात २ ते ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २५ जुलै रोजी साळावली धरणात ८४ टक्के पाणीसाठा होता. २७ जुलै अखेरीस हे धरण ९३ टक्के भरले. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास साळावली धरण पुढील काही दिवसांत पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांत गवाणे धरणातील पाणीसाठा ६ टक्क्यांनी वाढून ९२ टक्के झाला आहे. २७ जुलै अखेरीस तिळारी धरणात ८२ टक्के, आमठाणे धरणात ७७ टक्के, चापोलीमध्ये ६१ टक्के, पंचवाडीत ७८ टक्के, तर अंजुणे धरणात ५१ टक्के पाणीसाठा होता. हवामान खात्याने राज्यात २८ ते ३१ जुलै दरम्यान मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यात २४ तासांत २.२९ इंच पावसाची नोंद झाली. सांगेमध्ये ३.३६ इंच, तर म्हापसामध्ये ३.२६ इंच पाऊस पडला.
राज्यात १ जून ते २७ जुलै दरम्यान सरासरी ४८.६४ इंच पावसाची नोंद झाली. यंदा पावसाचे प्रमाण ३२.७ टक्क्यांनी कमी आहे. सोमवारी राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. पणजीत कमाल तापमान ३२ अंश, तर किमान २४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान ३१.६ अंश, तर किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस राहिले. २ ऑगस्टपर्यंत राज्यातील कमाल तापमान ३१ ते ३२ अंश, तर किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
साळावली धरण भरत आले असून पुढील आठवड्यात ते पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे. साळावली राज्यातील मुख्य धरणांपैकी एक आहे. अन्य धरणातही समाधानकारक पाणीसाठा आहे. धरणातील पाणीसाठ्याबाबत पेयजल व जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांची दर आठवड्याला बैठक होते. आम्ही जलस्रोत खात्याकडून विविध माहिती घेत असतो.
_ सुभाष फळदेसाई, पेयजलमंत्री
विविध केंद्रांत १ जून ते २५ जुलैपर्यंत झालेला पाऊस (इंचात)