युवकाकडून ८६ हजारांचे ड्रग्ज जप्त

पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) कळंगुट येथे कारवाई करत सागर मोरजकर (४२, रा. कळंगुट) याला अटक केली. त्याच्याकडून ८६ हजार रुपये किमतीची ८.६ ग्रॅम एक्टसी पावडर, ११ हजार रुपयांची रोख रक्कम आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली.
एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, कळंगुट येथील ख्रिस्तियानो रोनाल्डो पार्क परिसरात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती एएनसीला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक सुनीता सावंत व नेर्लोन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सगुण सावंत यांच्या नेतृत्वाखालील उपनिरीक्षक दिनदयाळनाथ रेडकर, हवालदार सुदेश नाईक, काॅन्स्टेबल साहील सिमेपुरुषकर, रशील नाईक, अक्षय नाईक, महिला काॅन्स्टेबल सीमा अरपरकर पथकाने सोमवारी मध्यरात्री सापळा रचला.संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या सागर मोरजकर याला ताब्यात घेऊन त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता ८.६ ग्रॅम एक्टसी पावडर आणि रोख रक्कम आढळली. त्यानंतर घरझडतीत आणखी १० हजार रुपये रोख जप्त करण्यात आले. एकूण ११ हजार रुपयांची रोख रक्कम, अमली पदार्थ आणि दुचाकी एएनसीने ताब्यात घेतली.
संशयिताला सात दिवसांची एएनसी कोठडी
उपनिरीक्षक दिनदयाळनाथ रेडकर यांनी संशयिताविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची एएनसी कोठडी सुनावली.