मडगाव रेल्वेस्थानक परिसरातील प्रकार

मडगाव : मडगाव रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर रेंट ए कॅब व्यवसाय करणार्या खासगी वाहनाला स्थानिक पिवळ्या काळ्या टॅक्सी चालकांनी अडवले. आरटीओ विभागाच्या अधिकार्यांनी संबंधित गाडी जप्त करत दहा हजारांचा दंड ठोठावला.
मडगाव रेल्वेस्थानकावरून खासगी गाड्यांमधून पर्यटकांची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची तक्रार स्थानिक टॅक्सी चालकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अशाचप्रकारे खासगी वाहनातून होणारी पर्यटक, प्रवाशांची वाहतूक रोखण्यात आली होती व त्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. पण हे प्रकार थांबलेले नाहीत.
सोमवारी सकाळी खासगी गाडीतून पर्यटकांची ने आण होत असल्याचे पिवळ्या काळ्या टॅक्सी चालकांच्या निदर्शनास आले. टॅक्सी चालकांनी सतर्कता दाखवत हे वाहन अडवले आणि आरटीओ अधिकार्यांना बोलावून घेतले. घटनास्थळी दाखल झालेल्या आरटीओ अधिकार्यांनी वाहनाची तपासणी केली. खासगी वाहन कोणत्याही परवान्याविना भाड्याने देत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १० हजारांचा दंड केला तसेच सदर वाहनही ताब्यात घेतले. या कारवाईनंतर टॅक्सी ऑपरेटर्सनी हे प्रकार बंद होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक टॅक्सीचालक ऋषभ कारापूरकर यांनी केली.
बेकायदा रेंट अ कारचे परवाने रद्द करा
मडगाव रेल्वेस्थानक परिसरात राजरोसपणे सुरू असणारी बेकायदा पर्यटकांना खासगी वाहने देण्याचे प्रकार थांबवावे. अशाप्रकारे बेकायदेशीर कामे करणार्या रेंट अ कार मालकांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी टॅक्सी चालकांनी केली आहे. प्रशासनाने उपाययोजना न केल्यास मडगावमधील टॅक्सी चालक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही देण्यात आला.