३,१८० रोजगारांची निर्मिती; मॅजेस्टिक प्राईडचा १०० कोटींचा हॉटेल प्रकल्प

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या (आयपीबी) बैठकीत ६२२ कोटी रुपयांच्या १४ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांमुळे राज्यात ३,१८० रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये मॅजेस्टिक प्राईड कंपनीच्या १०० कोटी रुपयांच्या हॉटेल प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यातून ३७४ रोजगार निर्माण होणार आहेत.
बैठकीला उद्योगमंत्री माॅविन गुदिन्हो, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे (जीआयडीसी) अध्यक्ष आमदार अालेक्स रेजिनाल्ड, महामंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते. हॉस्पिटॅलिटी, शिक्षण, इलेक्ट्रॉनिक्स आणि जहाजबांधणी या क्षेत्रांतील विविध गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. मे. व्हिक्टुरा टेक्नॉलॉजीज (१०२ कोटी रुपये, २५३ रोजगार), आग्नेल चॅरिटीज (१८८ कोटी रुपये, ७५९ रोजगार), कोहिनूर ऑप्टिशियन्स (७४ कोटी रुपये, ३०० रोजगार) आणि ट्रिनिटी टच (५० कोटी रुपये, २७५ रोजगार) या महत्त्वाच्या प्रकल्पांनाही हिरवा कंदील देण्यात आला.
सरकारचे रोजगार निर्मितीला प्राधान्य : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, राज्यात अधिक उद्योग सुरू व्हावेत आणि गुंतवणूक वाढावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मोठ्या उद्योगांना चालना देण्यासाठी नवीन योजना आणण्याचा प्रस्ताव असून त्यासंदर्भात उद्योजक, सरकारी अधिकारी आणि संबंधित घटकांशी चर्चा सुरू आहे. ‘स्वयंपूर्ण गोवा’ या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल करताना उद्योगांना आवश्यक सहकार्य देण्यास सरकार कटिबद्ध असून रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे.